Thursday, December 5, 2019

महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर


मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) 63वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर एकत्र आले आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झालं होतं. तेव्हापासूनच हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन'  म्हणून पाळला जातो. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे.

दलित समाजाला तसंच अस्पृश्यतेची वागणूक मिळणाऱ्या प्रत्येकासाठीच बाबासाहेबांनी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. जातीय भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध ते नुसते लढलेच नाहीत तर दलित समाजातील प्रत्येकाला त्यांनी मानाने जगण्याची शिकवण दिली. लाखो शोषित-पीडितांची लढाई लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. यादिवशी आंबेडकरांचे लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीत दाखल होत आपल्या बाबांना अभिवादन करतात.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सज्ज; अशी आहे व्यवस्था

केवळ अनुयायीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना आज चैत्यभूमीला भेट देऊन किंवा ट्वीट करत अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी पावणे आठ वाजता चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि सुभाष देसाई तसंच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only