Saturday, March 6, 2021

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदय शेळकेनगर,दि 6 प्रतिनिधी


-जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी मंत्री थोरात गटाचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली. आज दुपारी एक वाजता बँकेच्या मारूतराव घुले पाटील सभागृहात ही निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी शेळके व उपाध्यक्षपदासाठी कानवडे या दोघांचेच एकमेव अर्ज आले होते. निवडीनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. दरम्यान दक्षिण भागाला अध्यक्षपदाची संधी मिळाले आहे पारनेर तालुक्याला अध्यक्ष पदाचा हा मान देण्यात आला आहे.


संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी आ. शिवाजी कर्डिले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर, अशोक भांगरे, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, विवेक कोल्हे, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले हे संचालक उपस्थित होते. 


निवड प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री थोरात, जलसंधारणतंत्री गडाख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या बंगल्यावर नव्या संचालकांसमवेत बैठक झाली. त्यानंतर संचालक जिल्हा बँकेच्या सभागृहाकडे रवाना झाले होते. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून उदय शेळके यांच्याबरोबरच अन्य काही संचालकांच्या नावाची चर्चा होती. मात्र,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेळके यांच्या नावाला संमती दिल्याचे सांगितले जात आहे. बँकेच्या एकूण 21 संचालकांपैकी 17 संचालक बिनविरोध झाले होते. उर्वरीत चार जागांसाठी राष्ट्रवादी-थोरात गट व आमदार राधाकृष्ण विखे यांच्या गटात लढत झाली होती.


अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागावी याकरता अनेक खलबते झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संचालक या बँकेवर मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचाच अध्यक्ष व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी तसेच मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी समन्वय साधून अध्यक्षपदासाठी उदय शेळके यांच्या नावाची चर्चा केली होती. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर या नावावर एकमत झाले असल्याचे बोलले जात आहे.


अध्यक्षपदासाठी उदय शेळके, उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे या दोघांचे अर्ज असल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. नगर दक्षिणेला यंदा अध्यक्षपदाची धुरा मिळाली आहे. पारनेर तालुक्याला याचा मान मिळाला आहे. शेळके यांनी या अगोदर बँकेचे उपाध्यक्षपद सांभाळलेले होते. त्यांच्याकडे सध्या मुंबईच्या महानगर बँकेची सुद्धा जबाबदारी आहे.चौकट

भाजपचे सत्तेचे स्वप्न भंगले

जिल्हा बँकेवर सत्ता मिळविण्याचा भाजपने प्रयत्न केला. या निवडणुकीसाठी आ. राधाकृष्ण विखे, माजीमंत्री राम शिंदे व माजी आ. शिवाजी कर्डिले या तीन नेत्यांची समिती बनविली होती. मात्र, या निवडणुकीत शिंदे सक्रिय दिसले नाहीत. तर कर्डिले हे थोरात गटाबरोबर राहिले. भाजपच्या अन्य काही नेत्यांनीही या निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर जाणे पसंत केले. त्यामुळे भाजपचे बँकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंगले असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only