Tuesday, March 16, 2021

आरोपी लांडगेला चिल्लर घोटाळाप्रकरणी वर्ग करणार

 


नगर दिनांक 16 प्रतिनिधी

नगर अर्बन बँकेच्या 3 कोटीच्या चिल्लर गैरव्यवहार प्रकरणांमध्ये असलेल्या आरोपी आशुतोष लांडगे याला या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडलेल्या आरोपीकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असून, काही धागेदोरे सुद्धा त्यांच्याकडून हाती लागले आहेत. या घटनेमध्ये माजी संचालकांना पकडण्यासाठी दोन पथके रवाना केली असून, आज माजी खासदार दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते दिल्ली येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे याबाबत आता पोलीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींकडून सुरुवातीला माहिती मिळत नव्हती. आता त्यांच्याकडून काही माहिती हस्तगत झालेली आहे. तसेच काही कागदपत्र अद्याप पर्यंत मिळाले नसल्यामुळे, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आज पुन्हा बँकेमध्ये जाऊन झाडाझडती घेणार आहे.


तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळा प्रकरणामध्ये आशुतोष लांडगे या आरोपीचा समावेश आहे. सध्या तो 22 कोटी रुपयांचा घोटाळ्यामध्ये आरोपी असल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला नगरच्या या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने ती मान्य केली आहे. त्यामुळे आता त्याला या तीन कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. त्याची तयारी सुद्धा आता पूर्ण झाली आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये त्याला या गुन्ह्यामध्ये वर्ग केले जाणार आहे.


आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके माजी संचालकांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. अजून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पण दुसरीकडे भाजपाचे माजी खासदार तसा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी हे सुद्धा या गुन्ह्यमध्ये आरोपी आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, आज त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. दिल्लीचा एका खासगी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग त्यासंदर्भात काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only