Tuesday, March 9, 2021

नगर अर्बन बँकेचे अनेक घोटाळे उघड झाले

 


नगर दिनांक 9 प्रतिनिधी 

नगर अर्बन बँकेचे अनेक घोटाळे उघड झाले असतानाच येथील कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये तीन कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाची कागदपत्रे बँकेने गुन्हे अन्वेषण विभागाला सादर न केल्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने थेट नगर अर्बन बँकेमध्ये धाड टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केल्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये 22 कोटी रुपयांचा गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आरोपी आशुतोष लांडगे याच्यावर येथील कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा तात्काळ दाखल न झाल्यामुळे त्या वेळेला बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, पोपट लोढा, अनिल गट्टाणी यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करून या विषयाकडे लक्ष वेधले होते.


लांडगे याने नगर मध्ये स्वतःचे धनादेश हे पास करून घेण्यासाठी बँकेमध्ये कोणतीही रक्कम न भरता तीन कोटी रुपयांची चिल्लर भरले असे भासवले. त्याने त्याच्या खात्यातले सर्व धनादेश हे वटवून घेतले. ही बाब अन्य लोकांच्या लक्षात आल्यानंतर बँकेच्या वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. एक महिना उलटून गेला तरीही त्याची रक्कम कुठे दिसून आली नाही. त्याने बँकेमध्ये मी चिल्लर भरली आहे, असे भासवले. मात्र, तसा कोणताही प्रकार झाला नाही. त्यावेळी मार्केट यार्ड शाखेचे व्यवस्थापक यांनी माझ्याकडे कोणत्याही प्रकारची रक्कम संबंधिताने भरली नाही, असे लेखी पत्र बँकेला सादर केल्यामुळे बँकेच्या प्रशासनाचे वाभाडे पुढे आले.


या प्रकाराचा गुन्हा बँकेचे अधिकारी दाखल करायला तयार नव्हते. मात्र बँकेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या रेट्यामुळे शेवटी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून, त्याच लांडगे याच्यावर सध्या पिंपरी-चिंचवड शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. त्याला काल पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली असून, दिनांक पंधरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.


कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये तीन कोटी रुपयांच्या दाखल झालेला गुन्हा हा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे नगर येथे वर्ग करण्यात आलेला होता. बँकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला सादर केली नव्हती. वेळोवेळी सांगून देखील कागदपत्रे जमा न केल्याने आज नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्यासह पथकाने आज सायंकाळच्या सुमारास अर्बन बँकेच्या मुख्य शाखेमध्ये घेऊन कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. कशा पद्धतीने व्यवहार झाले, कशा पद्धतीने दाखवण्यात आले, त्या महिन्याचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने बँकेने केला यासह आशुतोष लांडगे याच्या नावावर असलेले पैसे व त्याचा खाते उतारा यासह विविध माहिती सुद्धा या पथकाने घेण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू होती.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only