Monday, March 8, 2021

शेकडो शेतकरी झाले कर्जमुक्त

 


शेकडो शेतकरी झाले कर्जमुक्त

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र बँकेने शेतकर्‍यांना त्यांच्या घरी जाऊन कर्ज देण्याचा उपक्रम राबविल्यानंतर आता जे शेतकरी वर्षानुवर्षे थकबाकीत गेले आहेत, त्यामुळे त्यांना नवीन कर्जही घेता येत नाही, अशा शेतकर्‍यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी एकरकमी कर्जफेड योजना सुरू केली आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसांत शेकडो शेतकरी कर्जमुक्त झाले. तीन कोटी रुपये शेतकर्‍यांनी पुढे येत भरले. अशा शेतकर्‍यांना अवघ्या 48 तासांत नवीन कर्ज बँकेकडून दिले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा प्रतिसाद वाढला आहे.

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे शेतकर्‍यांसाठी कठीण होते. त्यामुळे पीक कर्जाची रक्कम वर्षागणिक वाढत जाते. परिणामी संबंधित शेतकर्‍यांना पुन्हा एकही बँक पीक कर्ज देत नाही. अशा शेतकर्‍यांना पुन्हा उभारी देण्यासाठी ‘एकरकमी कर्जफेड’ योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागांतील अधिकाधिक शेतकरी सहभागी व्हावेत, यासाठी शाखा व्यवस्थापक जनजागृती करीत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय, 23 फेब्रुवारीपासून शेकडो शेतकर्‍यांनी पुढे येत तब्बल तीन कोटींचा भरणा केला. यावेळी उपक्षेत्रीय प्रबंधक सत्येन कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांना नवीन कर्ज देण्याचा विश्‍वास दिला होता. यावेळी विभागीय कृषि व्यवस्थापक दादासाहेब कुंभार उपस्थित होते. त्यानुसार अवघ्या 48 तासांत अनेक शेतकर्‍यांना नव्याने अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. याची सुरुवात बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक राजीव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only