Saturday, March 20, 2021

जरे हत्येप्रकरणी बाळ बोठेच्या पोलीस कोठडीत २३ मार्च पर्यंत वाढ

 


जरे हत्येप्रकरणी बाळ बोठेच्या पोलीस कोठडीत २३ मार्च पर्यंत वाढ


पारनेर : प्रतिनिधी


      यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत २३ मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायाधिश उमा बो-हाडे यांनी शनिवारी दिले. 

     

     दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बोठे यास न्यायालयापुढे उभे करण्यात आले. तपासी अधिकारी अजित पाटील यांनी यावेळी बाजू मांडताना न्यायालयापुढे विविध मुद्दे उपस्थित केले. घटनेच्या दिवशी व दुसऱ्या दिवशी बोठे याने कोणते फोन नंबर वापरले, त्यास इतर कोणी मदत केली आहे का, बोठे याने काही लोकांना पत्र लिहिली आहेत, काहींना ती पाठविलीही आहेत. काही पत्रे तपासात हस्तगत करण्यात आली आहेत. त्याने पाठविलेल्या पत्रांमध्ये काय मजकुर होता, २४ नोहेंबर व  ३० नोहेंबर रोजी मयत रेखा जरे यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बोठे याने काही लोकांना पाळतीवर ठेवले असण्याची शक्यता आहे. अशा लोकांची नावे निष्पन्न करायची आहेत.त्यासाठी बोठेच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करावी अशी मागणी पाटील यांनी केली.

        

     आरोपी बोठे  १२ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथे पोहचल्याचे सांगत आहे. तोपर्यंत त्याचे वास्तव्य कोठे होते, फरार असताना त्याने  वापरलेले  वाहन जप्त करायचे आहे. मयत रेखा जरे व बोठे यांच्यात काही आर्थिक व्यवहार होते का, बोठे याने जरे यांच्या हत्येची १२ लाख रुपयांना सुपारी दिली होती. ही रक्कम बोठे याने कशी उभी केली, हैद्राबादमधील एक महिला आरोपी फरार आहे या महिलेचाही शोध घेणे बाकी आहे. आदी कारणांसाठी बोठे याच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी पाटील यांनी न्यायालयाकडे केली. सरकारी वकील मनिषा डुबे यांनी बोठे याच्या

हस्ताक्षराचा तसेच आवाजाचा नमुना घेण्यात आला असून या गुन्हयात बोठे याने वापरलेेली दुचाकी तसेच आयपॅड जप्त करण्यात आल्याचे सांगितले.

        

     पोलिस कोठडीत वाढ करण्याच्या तपासी अधिकाऱ्यांच्या मागणीवर आरोपी बोठे याचे वकील महेश तवले यांनी जोरदार आक्षेप घेत सात दिवस पोलिस कोठडी मिळूनही तपासात काहीही प्रगती झाली नसल्याचे नमुद केले. १३ मार्च रोजी सादर करण्यात आलेला रिमांड रिपोर्ट व आज सादर करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये काहीही बदल नसल्याचे तवले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. गुन्हयाच्या संदर्भात काय प्रगती झाली हे सांगण्याऐवजी तपासी अधिकारी गुन्ह्याशी सबंध नसलेल्या बाबींचा संदर्भ देत तपासात प्रगती झाल्याचे सांगत आहेत. सरकारी वकीलांनी दुचाकी तसेच अयपॅड जप्त करण्यात आल्याचे सांगितले आहे. परंतू जरे यांची हत्या झाली त्यावेळी घटनास्थळावर हजर असलेल्या दोघा आरोपींनी वापरलेली दुचाकी त्याच वेळी जप्त करण्यात आली आहे. गुन्हा घडला त्यावेळी आरोपी बोठे हा घटनास्थळी हजर नव्हता.बोठेने वापरलेली दुचाकी तसेच आयपॅडचा गुन्ह्याशी थेट सबंध नाही त्यामुळे तपासात काहीही प्रगती नसल्याचे तवले यांनी सांगितले.

      

     बाळ बोठे व सागर भिंगारदिवे यांनी वापरलेले  मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. बोठेने लिहिलेली पत्रे ही गुन्ह्याशी सबंधित नाहीत.ती त्याने त्यांच्या कुटूंबियांना लिहिलेली असून घरगुती तसेच आर्थिक अडचणीसंदर्भात त्यात उल्लेख असल्याचे तवले यांनी सांगितले. वकील अक्षय गोस्वामी यांनीही बोठे याच्या बाजूने युक्तीवाद केला. वकील संकेत ठाणगे यांनी तवले व गोस्वामी यांना सहाय्य केले.कोतवाली पोलीसही न्यायालयात हजर

    

      कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर  न्यायालयात उपस्थित होते. बोठे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात पाच ते सहा गुन्हे दाखल असून बोठे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बोठे याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आल्याने आता कोतवाली पोलिसांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर बोठे याचा ताबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only