Monday, March 8, 2021

गौतम हिरण यांच्या हत्येची चौकशी करा

 


गौतम हिरण यांच्या हत्येची चौकशी करा

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस, विखे पाटील यांची विधानसभेत मागणी

नगर :

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांची अज्ञातांनी नुकतीच हत्या केली आहे. या हत्येचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. आहे तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.


बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या  गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला.


हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांचा यापूर्वीच घातपात केला असण्याची दाट शक्यता आहे.


दरम्यान, आज विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान फडणवीस व विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हिरण यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. फडणवीस म्हणाले की, बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. राज्यभरात पोलिसांचा वचक राहिला नसल्याची परिस्थिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबत तात्काळ विधानसभेत निवेदन करण्याची गरज आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, सरकारचा पोलिस प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे ही फडणवीस म्हणाले.


त्यानंतर आमदार विखे पाटील यांनी हिरण यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. विखे पाटील म्हणाले की, हिरण हा अत्यंत हुशार होता. तो एका स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातला मुलगा आहे. अपहरण झाल्यानंतर गावकरी हे पोलिसांना विविध प्रकारची माहिती देत होते. मात्र पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत शिष्टमंडळ गेली. अशा प्रकारे तरुण मुलाची हत्या होते. हे खरं म्हणजे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. गुंडांवर कुठल्याही प्रकारची दहशत राहिलेली नाही. दहशत कोणावर तर आंदोलन करणाऱ्या मुलांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांची दहशती गुंडांवर पाहिजे की, सामान्य नागरिकांवर पाहिजे. निदान भविष्यात तरी अशा घटना होणार नाही याची काळजी शासन घेणार का? असाही सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.


हिरण यांच्या अपहरणानंतर बेलापूर येथे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. घटनेची गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only