Friday, March 5, 2021

मास्क न घालणार्‍या डॉक्टरची मारहाण
नगर ः कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पहिली ढाल म्हणून मास्क आहे. डॉक्टर तर आवर्जुन मास्क वापरा आणि कोरोना टाळा, असे सांगतात. परंतु नगरमध्ये डाॅक्टरच मास्क न घालता किंवा मास्क नाकाऐवजी तोंडाच्या हनुवटीवर घालून फिरत आहेत. या डॉक्टरावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला धक्काबुकी झाली आहे. ही मारहाण चक्क मास्कचा योग्य वापर न करणार्‍या डॉक्टरने केली आहे. या डॉक्टरविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होत होती. दरम्यान, महापालिका युनियनने पोलीस बंदोबस्ताशिवाय कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे.

नगर शहरात आज 107, तर भिंगार शहरात 10 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. दिवसागणित नगर शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहे. यात कोरोनाला रोखण्यासाठी पहिली ढाल म्हणून मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. जिल्हा प्रशासनाने मास्क न वापरणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाईच्या सूचना केल्या आहेत. महापालिकेने देखील मास्क न घालणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. महापालिकेचे कोरोन प्रतिबंध पथक आज सायंकाळी साडेसहा वाजता प्रोफेसर कॉलनी चौकात मास्क न घालणार्‍यांविरोधात कारवाई करत होते. एक डॉक्टर नाकावरील मास्क तोंडाच्या हनुटीवर घालून फिरत होता. या डॉक्टरला थांबून पथकातील देविदास बोज्जा, विष्णू देशमुख, अमित मिसाळ व गोंटला यांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यावर डॉक्टरने पावती करणारे विष्णू देशमुख यांना मारहाण केली. या देशमुख यांचा चष्मा तुटला आणि डोक्याला मार लागला. याप्रकरणी पथकाने मारहाण करणार्‍या डॉक्टरला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. तिथे संबंधित डॉक्टरावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पोलीस बंदोबस्त मिळाला, तरच महापालिकेचे कर्मचारी मास्क न वापरणार्‍यांविरोधात उद्यापासून कारवाई करेल, अशी भूमिका महापालिका युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी मांडली. महापालिका यावर काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. डॉ. पुरूषोत्तम अहुजा याच्याविरोधात तोफखाना पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

 

(चौकट...)

दोन लॉन्सवर कारवाई

शहरातील हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्समध्ये  लग्नाचे कार्यक्रम चांगलेच रंगत आहेत. या कार्यक्रमांना लोकांच्या उपस्थितांची मर्यादा जिल्हा प्रशासनाने घालून दिली आहे. लग्न कार्यासाठी 50 व्यक्तींचे निर्बंध आहे. 50 पेक्षा जास्त लोक असल्यास संबंधित मंगल कार्यालय व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मध्यतंरी स्वतः अशा कारवाई केल्या आहेत. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी आज दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई केली. नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसरातील दोन लॉन्सवर ही कारवाई झाली. येथे लग्न समारंभ सुरू होते. तेथे तोेबा गर्दी होती. कोतवाली पोलिसांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड या लॉन्स व्यवस्थापकांकडून आकारला आहे.


(चौकट...)

लॉन्स व्यवस्थापनांची शक्कल!

लॉन्स, हॉटेल तसेच मंगल कार्यालयावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई झाल्यानंतर त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून लॉन्स व्यवस्थापकांनी त्यातून मार्ग शोधला आहे. गर्दी मंगल कार्यक्रम करणार्‍या लोकांमुळे होते. होणारा हा दंडाची आर्थिक रक्कम या लोकांकडून लॉन्स व्यवस्थापक आकारत आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई झाली, तरी लॉन्स व्यवस्थापकांना काहीही आर्थिक भुर्दंड पडत नाही. तो संबंधित कार्यक्रम करणार्‍यांना होतो. त्यामुळे या दंडाची रक्कम 50 हजार रुपयांपुढे करण्यात यावी, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only