Friday, April 9, 2021

अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासणार. शहर प्रमुख दिलीप सातपुते.


 

रेमडीसीवीर’चा तुटवडा दूर न केल्यास

अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासणार. शहर प्रमुख दिलीप सातपुते.

सहाय्यक आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला शिवसेनेने घातला फुलांचा हार

नगर- कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीवीरचा इंजेक्शनचा नगर शहरात तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत आहे. याचाच जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 9) गेले असता तेथे अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच तेथील कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला.

शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडीसीवीर इंजेक्शन रुग्णांना सहज उपलब्ध होत नाही. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्या प्रकारचे नियोजन केले जात आहे याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, विशाल वालकर आदी पदाधिकारी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात गेले. मात्र तेथे सहाय्यक आयुक्त राठोड हे जागेवर नव्हते. तसेच त्यांचा मोबाईलही बंद होता. याबाबत तेथील कर्मचार्‍यांना विचारणा केली असता कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आम्हाला काही माहिती नाही. साहेब आमचेही फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी राठोड यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध केला. रेमडीसीवीर इंजेक्शनबाबत तत्काळ उपाययोजना करून पुरवठा सुरळीत न केल्यास संबंधित अधिकार्‍यास काळे फासण्याचा इशारा शहरप्रमुख सातपुते यांनी दिला आहे.

कोरोना महामारीत अधिकार्‍यांनी नागरिकांच्या अडचणींचा विचार केला पाहिजे. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे. परंतु फोन उचलायचे नाही, फोन बंद करायचे, कार्यालयात थांबायचे नाही असे अधिकार्‍यांचे वागणे योग्य नसून अधिकार्‍यांनी त्यात सुधारणा करावी, अशी अपेक्षा सातपुते यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only