Monday, April 12, 2021

उपासमार होणार्‍या सर्व घटकांना आर्थिक पॅकेज द्यावे- अरुण मुंडे

 


जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


निर्बंध शिथिल करावेत तसेच  लॉकडाऊनच्या काळात उपासमार होणार्‍या सर्व घटकांना आर्थिक पॅकेज द्यावे- अरुण मुंडे


     नगर- अहमदनगर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभुमीवर निर्बंध शिथिल करावेत तसेच लॉकडाऊनच्या काळात उपासमार होणार्‍या सर्व घटकांना आर्थिक पॅकेज द्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हा भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे व जिल्हा सरचिटणीस दिलिप भालसिंग यांनी  जिल्हाधिकारी यांना दिले.


     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभुमीवर महाविकास आघाडी सरकार कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे असंघटित कामगार पुन्हा आपल्या मूळ गावी परत जाण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आर्थिक मदत आणि  अन्नछत्र या माध्यमातून या कामगारांना दिलासा द्यावा.  शासनाने अंशत: निर्बंध कष्टकरी मजूरांचा रोजगाराच्या संधी कमी करणारी आहेत. त्यामुळे या आपत्तीच्या काळात सरकार व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मजूर व गरजू लोकांसाठी मोफत अन्नाछत्र सुरु करावे.


     सरकारने तुर्तास लॉकडाऊन करु नये. लॉकडाऊन करायचे असल्यास  शेतकरी, कामगार, शेतमजूर, छोटे व्यवसायिक, कारागिर, बारा बलुतेदार, कामगार, पारंपारिक कलाकार, अशा सर्वांच्या खात्यावर प्रतिमहा 10 हजार रुपये  जमाकरावेत. त्यानंतरच लॉकडाऊन लागू करण्यात यावा. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधात्मक लस देण्याबाबत राज्यव्यापी कार्यक्रम राबववा. एक वर्षाचा कोरोनाचा काळा पाहता राज्य  सरकारने आरोग्य यंत्रणेत कोणतीच सुधारणा केलेली नाही.


     जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर गंभीर आजार असणार्‍यांची संख्याही वाढू लागली आहे. जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना बाजारातील कोरोनासाठी लागणारे इंजेक्शनचे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे रेमडिसेवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू देवू नका. गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मोफत द्यावे, तसेच इंजेक्शनचा  पुरेसा साठा ठेवून, त्याचा काळा बाजार होणार नाहीा याची खबरदारी घेण्यात यावी. शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत येणारे  हॉस्पिटल रुग्णांना अ‍ॅडमिट करुन घेत नाहीत व सदर योजनेचा लाभ संबंधित रुग्णांना देत नाहीता, अशा हॉस्पिटलवर तातडीने कारवाई करावी.


     कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाने जारी केेलेल्या कडक निर्बंधांतर्गत अनेक छोटे व्यवसायिकांची दुकाने बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे शासनाने या व्यवसायिकांना आर्थिक मानधान द्यावे किंवा नियमामध्ये शिथिलता आणून व्यवसाय  चालू करण्यास परवानगी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.


     या निवेदनाच्या प्रति मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only