Wednesday, April 28, 2021

ऑक्सीजनचे वाटप करण्यासाठी आता टास्क फोर्सची निर्मिती

 


नगर दिनांक 28 प्रतिनिधी


नगर जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या वाढत चालल्यामुळे ऑक्सिजनचा साठासुद्धा आता व्यवस्थित रित्या मिळावा याकरता एका टास्क फोर्सची निर्मिती केली असून, आज पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रुग्णालयांना वेळेमध्ये कशा पद्धतीने ऑक्सिजन मिळेल यासाठी ती कमिटी उपाययोजना करेल असे वक्तव्य नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केले.


जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, आज नगर जिल्हा वैद्यकीय असोसिएशनच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये रुग्णालयाने आम्हाला ऑक्सिजन तात्काळ मिळावा अशी मागणी केली होती. तसेच ऑक्सिजन पुरवठा करताना आम्हाला पूर्णक्षमतेने करावा, यासह विविध प्रकारच्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपामध्ये मांडल्या होत्या. त्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, ऑक्सिजनचा पुरवठा वेळेमध्ये व्हावा याकरता आता टास्क फोर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कमिटीमध्ये तहसीलदार, तसेच आयएमए चा प्रतिनिधी व अन्य सदस्य राहणार आहे. जे आपल्याला ऑक्सिजन बाहेरून येतो तो वेळेमध्ये संबंधित रुग्णालयाला बेडच्या संख्येनुसार कशा पद्धतीने पोहोचवता येईल या प्रकारचे नियोजन ही कमिटी करेल. कोणावर त्याचा अन्याय होणार नाही व सगळ्यांना वेळेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होईल या दृष्टिकोनातून ही कमिटी काम करेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश सुद्धा आम्ही दिले असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.


नगर जिल्ह्यासाठी 50केएल ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. सध्या नगर जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे आता रुग्णालयांना सुद्धा क्षमतेपेक्षा जास्त बेड करावे अशा प्रकारच्या सूचनाही दिलेल्या आहेत. त्यामुळे आता ऑक्सिजनची मागणीसुद्धा वाढणार आहे. त्यानुसार संबंधित रुग्णालयात ऐनवेळी ऑक्सीजनची मागणी न करता किमान बारा तास अगोदर ऑक्सिजनसाठी संपर्क करावा. ज्या ठिकाणी रिफिलिंग केले जाते त्या ठिकाणी त्यांनी आपले सिलेंडर द्यावे व आपला प्रतिनिधी तेथे नेमावा अशा प्रकारच्या सूचनासुद्धा आजच्या बैठकीत दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only