Monday, May 3, 2021

लाच मागितल्याप्रकरणी डिवायएसपींच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल




नगर दिनांक 3 प्रतिनिधी 

शेवगाव तालुक्यामध्ये वाळूचे ट्रक पकडल्या नंतर त्याच्यावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तीन पोलिस कॉन्स्टेबलच्या विरोधात लाललुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा नोंदवला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वसंत कान्हु फुलमाळी (राहणार शंकर नगर, पाथर्डी), संदिप वसंत चव्हाण (राहणार पोलीस वसाहत शेवगाव, जि. नगर), कैलास नारायण पवार (राहणार शंकर नगर, पाथर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तीनही आरोपी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकात नियुक्तीस होते.


यातील तक्रारदार यांची वाळूची ट्रक उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव  सुदर्शन मुंढे यांच्या या तिघा पोलिसांनी 7 एप्रिल रोजी पकडली. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात व वाळु वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून पैशांची मागणी करण्यात आली. 7 एप्रिल रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान तिन्ही आरोपी यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.


त्यानुसार आरोपीच्या विरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात येथे गुन्हा दाखल केला असून, हे तिन्ही आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत  आहे.


पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे,  निलेश सोनवणे  अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक विजय जाधव,  यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only