Thursday, May 20, 2021

हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये आणखीन एक आरोपी अटकेत
 नगर दिनांक 20 प्रतिनिधी


 नगर तालुक्यातील हनी ट्रॅप प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणांमध्ये हिंगणगाव येथील राहणारा बापू सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचा तपास करत असताना महत्त्वाची माहिती सुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहेत त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.


नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये आता बापू सोनवणे (राहणार हिंगणगाव) याला अटक करण्यात आली आहे. बापू सोनवणे हा व्यवसायिक असून, त्याने त्या महिलेची साथ देऊन इतरांना फसविण्याचा प्रकार केला आहे. हे तपासामध्ये उघड झाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी बापू सोनवणे याला त्याच्या घरातून अटक केली आहे. तसेच त्याची चार चाकी आलिशान गाडी सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.


या महिलेच्या घराची घराची सुद्धा पोलिसांनी झडती घेतली असून, या ठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. तसेच काही बँकेचे कागदपत्र सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच तिच्याकडे असलेल्या मोबाईल वरून तिने आतापर्यंत कोणाकोणाला कशा कशा पद्धतीने संपर्क केला, तसेच तिच्याकडे कोणकोणते व्हिडिओ आहे याच्या सुद्धा पोलिसांनी आता शोध सुरू केलेला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलेकडे दोन मोबाईल असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, ते पोलिसांनी हस्तगत केले आहेत.


या प्रकरणामध्ये बापू सोनवणे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून अन्य माहिती सुद्धा आता पोलिसांना मिळणार आहे. त्याची चार चाकी गाडी पोलिसांनी हस्तगत केली असून, सोनवणे याच्यावर नगर शहरातील कोतवाली, पारनेर यासह विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्याचे कोण कोण साथीदर आहेत याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढत जाणार आहे.


चौकट

या हनी ट्रॅप प्रकरणात ज्या महिलेला अटक केली आहे तिच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती आता पुढे येत आहे. तसेच ज्यांची ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क केला तर अधिक सोयीचे होऊन या प्रकरणाचा तपास सुध्दा चांगला होईल. पोलीस आता या गुन्ह्यासह तीन कोटी रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये कोण कोण सामील आहे, याचा शोध घेत असल्याचे नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी यावेळी सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only