Monday, May 31, 2021

कोरोनाची तिसरी लाट येणार, तयारी करा. विशेष पोलीस महानिरीक्षकांचे निर्देश



नगर दिनांक 21 प्रतिनिधी 


कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात असून, त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ज्या पोलिसांचे लसीकरण झाले नाही तेसुद्धा तात्काळ पूर्ण करावे. जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे व जे आरोपी  फरार आरोपी आहेत त्यांना शोधून अटक करावी, अशा प्रकारचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अस्वथी दोरजे यांनी दिले असल्याची माहिती नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.


दोरजे यांनी नगर जिल्ह्यातील पोलीस विभागाचा आढावा आज येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आदी यावेळी उपस्थित होते.


त्यानंतर बोलताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून तात्काळ उपाय योजना करा. स्थानिक पातळीवर जी काही मदत आपल्याला करता येईल ती करा. पोलीस दलामधील ज्यांचे लसीकरण पूर्णत्वाला गेले आहे त्याची खात्री करा. ज्यांना लस दिलेली नाही त्यांना तात्काळ लसीकरण कसे होईल हे त्वरित पाहावे. जे पोलीस कर्मचारी कोरोनातून बरे झालेले आहेत व आता घरी उपचार घेत आहे अशांच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या उपचार पद्धतीची माहिती सातत्याने घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे सांगितले.


जिल्ह्यामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा तपास तात्काळ करावा. तसेच जे फरारी आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. पावसाळा पूर्वीचा विषय लक्षात घेऊन काय काय उपाययोजना तात्काळ करता येतील, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते अथवा गावातील रस्ते हे बंद होणार नाहीत, याची सुद्धा खबरदारी घ्यावी असे त्यांनी सांगितले असल्याचे पाटील यांनी सांगितले.


जिल्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा सुद्धा त्यांनी घेतला आहे. लॉक डाऊनकाळात ज्या केसेस केलेल्या आहेत त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येईल का हे पहावे, असे निर्देश सुद्धा त्यांनी दिले आहेत.


जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये जे काही रुग्णालय आहेत त्याठिकाणी रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तेथे आल्यानंतर जेवणासाठी सुद्धा मोठी गर्दी होत असते. ती गर्दी कमी करता येईल का या करता सुद्धा उपाययोजना कराव्यात, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


चौकट

सध्या कोरोनाचा विषय सुरू आहे. उपायोजना बरोबरच खबरदारीची सुद्धा दखल सर्वांनीच घेतली पाहिजे. म्हणून आता नव्याने बिट मार्शल प्रत्येक ठिकाणी कार्यान्वित करावे, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only