Saturday, May 8, 2021

लसीकरणासाठी राज्य सरकारने स्वतंत्र ॲप तयार केले पाहिजे महसूल मंत्री थोरात

 
नगर दि 8 प्रतिनिधी


 लसीकरणा मध्ये सध्या जिल्हास्तरावर सगळा सावळागोंधळ चालू आहे, केंद्र सरकारने जे ॲप दिले आहे त्यामुळे ही अवस्था आली आहे. लसीकरण मोहीम सुधारण्यासाठी आता राज्य सरकारचे स्वतंत्र ॲप पाहिजे व जो काही गोंधळ निर्माण झाला आहे तो तात्काळ दूर केला पाहिजे असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते पण त्यांना यश येत नाही. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत पण केंद्राची सुद्धा आता महत्त्वाची भूमिका आहे असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आढावा बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी यावेळी उपस्थित होते.


महसूल मंत्री थोरात म्हणाले की, लसी संदर्भात अनेक समस्या आता निर्माण झाल्या आहे. नगर जिल्ह्यामध्ये आता नाशिक, पुणे या जिल्ह्यातील नावे लसीकरणासाठी येऊ लागली आहेत. ही बाब गंभीर आहे. केंद्र सरकारने जे अँप तयार केलेले आहे त्यामुळे काही गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ते वातावरण दूर करण्यासाठी आता राज्य सरकारने सुद्धा यासंदर्भात नव्याने राज्य सरकारचे स्वतंत्र ॲप तयार करण्याची गरज आहे. त्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही करणार असल्याचे महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले. अनेकांना केंद्राबाहेर उभे राहून लस मिळत नाहीत, लसीचा साठा उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे. नागरिकांनी सुद्धा या सर्व बाबींचा विचार करूनच केंद्रावर जावे. पण, दुसरीकडे जो काही गोंधळ लसीकरणाबाबत सुरू आहे त्यामध्ये सुसूत्रता कशी आणता येईल हे अगोदर पहाणे महत्त्वाचे आहे, असेही  ते म्हणाले. एखाद्याने त्याची माहिती अपलोड केलेली असते मात्र त्याला लस दिली जात नाही. पण दुसरीकडे त्याला लस दिल्याचे सर्टिफिकेट मिळते ही बाब अत्यंत गंभीर आहे. असे कोठेही होता कामा नये. यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ कडक पावले उचलावीत असेही थोरात म्हणाले. ज्या व्यक्तीकडे मोबाईल नाही म्हणून त्यांना लस नाही असे होता कामा नये. त्यासाठी रजिस्ट्रेशन करून प्रशासनाने त्यांना लस उपलब्ध करून दिली पाहिजे असे थोरात म्हणाले.


नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे, ही चिंतेची बाब आहे. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रशासन काम करत आहे मात्र त्यांना यश येत नाही. हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणून आजच्या बैठकीमध्ये यावर सविस्तर अशी चर्चाही करण्यात आली. नगर शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये ही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून आता विलगिकरण कक्षामध्ये दाखल करावे. त्यासाठी आता महानगरपालिकेने सुद्धा स्वतंत्र टीम नगर शहरामध्ये तयार केलेली आहे व ते सुद्धा आता त्याची अंमलबजावणी करतील, असेही थोरात यांनी सांगितले.

लोक हे लोकप्रतिनिधींचे ऐकतात हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे नगर शहरामध्ये सुद्धा आता लोकसहभाग वाढवून जे रुग्ण घरांमध्ये उपचार घेत आहेत त्यांना तात्काळ दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले पाहिजे व त्यासाठी आता लोकप्रतिनिधीसुद्धा पुढे आले पाहिजे, असेही थोरात म्हणाले. मागच्या वेळेला मी एक हजार बेडचे नियोजन करा असे सांगितले होत. आता महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे सध्याच्या परिस्थितीचा विषय पाहता त्यांना त्या प्रकारच्या सूचनाही दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत, यासंदर्भात केंद्र सरकारची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे असेही थोरात यांनी सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only