Tuesday, May 4, 2021

ऑक्सिजन नियंत्रणासाठी सहा पथकांची नियुक्ती .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली

 ऑक्सिजन नियंत्रणासाठी सहा पथकांची नियुक्ती


। नगर । दि.04 मे । नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी लागणार्या ऑक्सीजनची गरज आणि उपलब्धता यासंदर्भात नियोजन करण्यासाठी अधिकार्यांचा समावेश असलेल्या सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकातील अधिकारी ऑक्सिजन प्लांटवर थांबून नियोजन करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी नोडल अधिकारी व रिफिलर प्लांटधारक यांची संयुक्त बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.


नगर जिल्ह्यातील अहमदनगर इंडस्ट्रीयस गॅस प्लांटसाठी रिपोर्टिंग ऑफीसर म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) पल्लवी निर्मळ, तर इनचार्ज ऑफिसर म्हणून सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम आणि नायब तहसीलदार (नेवासा) डी. एम. भावले यांची नियुक्ती केली आहे.


हायटेक एअर प्रोडक्टस (एमआयडीसी, अहमदनगर)  येथील प्लांटवरील ऑक्सिजन निर्मिती व नियंत्रणासंदर्भात रिपोर्टिंग ऑफीसर म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) उज्ज्वला गाडेकर आणि इनचार्ज ऑफीसर म्हणून तहसीलदार (पुनर्वसन) वारुळे व नायब तहसीलदार (गृह शाखा) राजू दिवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अखत्यारित तीन पथके कार्यरत असतील.


ऑक्सीजन प्लांट परिसरात सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अनेकजण ऑक्सिजन प्लांटच्या परिसरात गर्दी करतात. त्यामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊन सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन संबंधित प्लांटच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.


ऑक्सिजन रिफिलर यांना ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या ऑक्सिजनच्या दैनंदिन नोंदी घेणे, प्राप्त ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय कारणाकरिता वितरित होत असल्याची खातरजमा करणे, ऑक्सीजन रिफिलर यांचेकडून गैरवैद्यकीय कारणाकरिता ऑक्सिजन पुरवठा होत असल्यास आवश्यक ती कारवाई करणे, ऑक्सिजन रिफिलर यांचेकडून वितरण झालेल्या हॉस्पिटलच्या नोंदी ठेवणे, तसेच उपलब्ध करून देण्यात आलेली ऑक्सिजनची मात्रा याबाबतही नोंदी ठेवणे, रिफिलिंग प्लांट वरून निघालेला ऑक्सीजन वितरण करावयाच्या हॉस्पिटलला पूर्ण क्षमतेने प्राप्त झाल्याबद्दल खात्री करणे, आदी कामे या पथकांकडे सोपवण्यात आली आहेत. 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only