Saturday, May 29, 2021

महापालिका स्वतःचे हॉस्पिटल उभारू शकत नाही हे दुर्दैव : खासदार सुजय विखेमहापालिका स्वतःचे हॉस्पिटल उभारू शकत नाही हे दुर्दैव : खासदार सुजय विखे


नगर दिनांक 29 प्रतिनिधी


कोरोनाचे संकट असताना महानगरपालिका साधे स्वतःचे हॉस्पिटल सुरू करू शकले नाही. तसेच उपचार करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करू शकले नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केली. तुम्ही कोट्यावधी रुपये इतर हॉस्पिटलला देऊ शकता व स्वतःचं हॉस्पिटल आपण उभारू शकत नाही. सावेडी येथील प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या जागेमध्ये तात्काळ हॉस्पिटल उभारा. तसेच एखाद्या खाजगी संस्थेशी करार करून त्यांच्याबरोबर आरोग्याच्या सेवा सुविधा सुद्धा नगरकरांना उपलब्ध करा. त्यासाठी निविदा मागवून घ्या, असे आदेश खासदार विखे यांनी बैठकीत दिले.


आज महानगरपालिकेमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक अनिल बोरुडे, सुवेंद्र गांधी, भैय्या गंधे, नरेंद्र कुलकर्णी, धनंजय जाधव, बारस्कर, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे आदी यावेळी उपस्थित होते.


कोरोनाची लाट आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या केल्या गेल्या नाहीत. नुसतेच मंगल कार्यालय घेतले. मात्र, त्याठिकाणी असलेले पेशंट सिरीयस झाल्यानंतर कुठे गेले, कोण कोणाला गोळ्या देत होतं, कोण कोणावर उपचार करत होतं, ते कोणालाच कोणालाच ठाऊक नाही. असा सगळा गलथान कारभार याठिकाणी पाहायला मिळाला. पेशंट सिरीयल झाल्यावर त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असलेले हॉस्पिटल शोधण्यासाठी तयारी करावी लागली. मग येथील महानगरपालिकेच्या प्रशासनाने केले काय, हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता, आपण कोट्यवधी रुपये बूथ हॉस्पिटल सारख्याला आपण देतो, ते देत असताना कुठल्याही पदाधिकारी, नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही. यासारखी शोकांतिका नाही. आपण स्वतःचे हॉस्पिटल सुरू करू शकत नाही. उपयोजना करू शकत नाही, यासारखे दुर्दैव नाही, असेही खासदार विखे म्हणाले.


आरोग्याचे काम करताना महानगरपालिकेमध्ये समन्वयाचा अभाव हा सातत्याने दिसून आलेला आहे. मी जर पहिल्या लाटेमध्ये टेस्टिंग सुरू केली नसती तर भयावह परिस्थिती झाली असती. यावेळी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे असे सांगितले जाते. त्याठिकाणी तशी परिस्थिती असेल तर तात्काळ ते हॉस्पिटल काढून टाका व दुसऱ्या ठिकाणी हॉस्पिटल उभे करा, असेही ते म्हणाले. आपण जर अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटल उभे करू शकलो नाही तर यासारखे दुर्दैव नाही, असे ते म्हणाले. तुम्ही तुमचे पैसे घालण्यापेक्षा जिल्हा नियोजन समितीतून तुम्ही पैसे मागा व ते हॉस्पिटल उभे करा असेही ते म्हणाले.


तुम्ही शहरामध्ये जे 45 सेंटर सुरू केले, त्याला सुद्धा उशीर झाला. त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. तिथे उपचार करणारे डॉक्टर किंवा परिचारिका उपलब्ध नाहीत, अशी अवस्था होती. मग तुम्ही त्यापेक्षा योग्य नियोजन का केले नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आज गरिबांना उपचार घ्यायचे कुठे व कसे? 

किमान गरिबांना तरी तुम्ही मदत द्या असेही ते म्हणाले.


कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. यासाठी तुमची साधी तयारी सुद्धा नाही. जर तुम्ही असे गाफील राहिले, तर परिस्थिती भयानक होईल. याचा सुद्धा गांभीर्याने विचार करा, असेही ते म्हणाले. तुम्ही ऑक्सीजन प्लांट एका ठिकाणी उभा करणार असाल तर ते दोन ठिकाणी उभारा. त्यासाठी पैसा उपलब्ध करा. जेणेकरून त्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होईल. पण जे काम तुमचे नाही त्यासाठी तुम्ही कशाला कष्ट घेता व कशाला पैसा खर्च करता, असा सवालही विखे यांनी यावेळी प्रशासनाला विचारला.


चौकट

मी अनेक वेळा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा पदाधिकाऱ्यांना नगर शहरामध्ये एम आर आय मशीन घ्या असे सांगितले. संबंधित निविदा काढली. त्या कंपनीने तुम्हाला मशीन उपलब्ध करून दिली. मात्र, तुम्ही ऐनवेळेला जागा बदलली. त्यामुळे हा विषय मागे पडला. आता तुम्ही एमआरआय मशीनपेक्षा सरसगट त्याचे पर्पज बदलून सिटीस्कॅन मशिन तेवढ्याच किमतीमध्ये घ्या. तात्काळ ते सुरू करा. जेणेकरून तिसऱ्या लाटेमध्ये त्याचा उपयोग होईल. 


चौकट

या ठिकाणी मी पदाधिकारी, प्रशासनाला अनेकदा आठवण करून देत अनेक गोष्टी सांगू शकतो. मात्र या ठिकाणी अनेकांना इगो तयार होतो. मात्र, आम्ही जेव्ह शिर्डी, राहता या ठिकाणी बैठका घेतो तेथे असा प्रकार कधीच नसतो. अशी खंत सुद्धा खासदार विखे यांनी यावेळी व्यक्त केली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only