Tuesday, May 18, 2021

सरसकट फळ व भाजी विक्री बंदीचा आदेश मागे घ्यावा शेतकरी, भाजी विक्रेते व नागरिकांच्या सोयीसाठी नियोजन करण्याची मागणी

 सरसकट फळ व भाजी विक्री बंदीचा आदेश मागे घ्यावा

शेतकरी, भाजी विक्रेते व नागरिकांच्या सोयीसाठी नियोजन करण्याची मागणी

चितळे रोड हातगाडी भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने महापालिकेत निवेदन


। अहमदनगर । दि.18 मे । शहरातील भाजी व फळे विक्रेत्या संबंधित घालण्यात आलेले निर्बंधाच्या आदेशात सुधारणा करून धोरणात्मक पद्धतीने आदेश देऊन शेतकरी, भाजी विक्रेते व नागरिकांच्या सोयीसाठी नियोजन करण्याची मागणी चितळे रोड हातगाडी भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे व कार्याध्यक्ष अरुण खीची यांनी महापालिका कार्यालयात दिले.

महापालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी होऊ नये, याकरिता 2 मे पासून भाजी व फळे विक्री तसेच किराणा दुकानांना बंदीचे आदेश दिले होते. सदर आदेशची मुदत 15 मे पर्यंत वाढविण्यात आली. नंतर या निर्बंधात दोन दिवसासाठी शिथीलया देण्यात आली होती. तत्पश्‍चात गर्दीचे कारण देत पुन्हा बंदीचा आदेश देण्यात आले. कोरोना सुरक्षा ही बाब वगळता दुसर्‍या बाबीकडे महापालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष असून या निर्णयाचे जनजीवनावर होणारे परिणामाचा विचार करण्यात आलेला नाही. या आदेशामुळे शेतकर्‍यांच्या मालाची आर्थिक नुकसान होत आहे. तर सर्वसामान्य भाजी व फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. रुग्णांसह नागरिकांच्या आरोग्यासाठी फलाहार व पालेभाज्या आवश्यक असताना त्यापासून त्यांना वंचित रहावे लागत आहे. शहरांमध्ये सर्व व्यवसाय बंद असून, तेथील कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी फळ व भाजी विक्री करीत आहे. या निर्बंधाने सर्वांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फळ व भाजी विक्री बंद करणे हा पर्याय नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सरसकट फळ व भाजी विक्री बंदीचा आदेश मागे घ्यावा, फळ व भाजी विक्रीस परवानगी देताना दोन व्यावसायिकांमध्ये दहा फुटाचे अंतर ठरवून द्यावे, सदर ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता पालिका व पोलिस प्रशासनाचे फिक्स पॉईंट ठेवावे, सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी, नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याची मागणी चितळे रोड हातगाडी भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only