Tuesday, May 18, 2021

पोलिस कर्मचार्‍याला मारहाण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । आरोपींना अटक

 पोलिस कर्मचार्‍याला मारहाण

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । आरोपींना अटक


अहमदनगर । 

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यास कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल पांडुरंग आव्हाड असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. दादाभाऊ फ्रान्सीस वंजारे आणि कैलास साळवे या दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सोमवार दि. 17 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आव्हाड हे कोविड 19 विषाणू रोगाच्या अनुषंगाने बोल्हेगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांविरूद्ध कारवाई करत होते. त्यावेळी आरोपी दादाभाऊ फ्रान्सीस वंजारे (वय 31, रा. वडगाव, गुप्ता, अहमदनगर) आणि कैलास साळवे हे दोघे दुचाकी (डीएन 09 ए 7371) वरून डबल सीट आले असता त्यांना आव्हाड यांनी दंड भरण्यास सांगितला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुचाकीवरून दोघांना फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. दंड भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने आरोपी साळवे हा फिर्यादी आव्हाड यांना शिवीगाळ करून तेथून पळून गेला. त्यानंतर आरोपी वंजारे याला दंड भरण्यास सांगितले असता वंजारे याने आव्हाड यांची गचांडी पकडून चापटीने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून कामकाज बंद पाडले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी दादाभाऊ वंजारे याला लगेच ताब्यात घेतले तर आरोपी साळवे याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरोधात भादंवि. कलम 353, 332, 504, 506, 188, 269, 271 साथीचे रोग प्रति. अधि. क. 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिपक पाठक हे करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only