Saturday, May 8, 2021

‘त्या’ बँकेची आणखी तीन बोगस प्रकरणे उघड ।


 


‘त्या’ बँकेची आणखी तीन बोगस प्रकरणे उघड । 

अहमदनगर - बोगस कर्ज प्रकरणात बहुचर्चित असलेल्या नगर शहरातील नामवंत बँकेत नगरसह श्रीगोंदा व राहाता तालुक्यांत बोगस कर्ज प्रकरणे उघडकीस आल्याने बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या तिन्ही प्रकरणासंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र तक्रारी देण्यात आल्या आहे. या तिन्ही प्रकरणांत तब्बल 40 कोटींची बोगस कर्जप्रकरणे झाल्याचे उघड झाले आहे.

नगर शहरातील सावेडी भागातील कर्जदाराने कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा तयार करण्याचा व्यवसाय असल्याचे दर्शवून त्याच्या व पत्नीच्या नावे कर्ज प्रकरण केले. त्यासाठी पुण्यातील सासवड येथील जमीन बँकेकडे तारण ठेवण्यात आली. या दांपत्याने नऊ कोटी 45 लाखांचे प्रकरण केले. त्यासाठी व्हॅल्युअरला मॅनेज करून बनावट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन दाखवून कर्ज प्रकरण करण्यात आले. हे प्रकरण बनावट असल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांकडे धाव घेण्यात आली आहे.

यापाठोपाठ राहाता तालुक्यातही असेच एक कर्जप्रकरण उघडकीस आले आहे. वाघमारे आणि कदम नामक व्यक्तींनी प्रत्येकी 10 व दोन कोटींचे कर्जप्रकरण केले. विशेष म्हणजे 10 कोटींचे कर्ज घेताना देशी दारूचे दुकान तर महिलेने कॉस्मेटिकचा व्यवसाय असल्याचे दर्शविले. येथेही बोगस कर्ज प्रकरणासाठी व्हॅल्युअरला मॅनेज करून बोगस प्रॉपर्टी व्हॅल्युएशन दाखवल्याचे निदर्शनास आले आहे.

तर श्रीगोंदा येथेही दूध उत्पादक कंपनीवर दोन प्लॅटवर 17 कोटी 50 लाख रुपयांचे दोन कर्जप्रकरण करण्यात आले. देऊळगाव गलांडे येथे दुधचा प्लँट दाखवून जमिनेचे बोगस कर्जप्रकरण करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कर्जदारासह जामीनदारावरही गुन्हा दाखल करावा यासाठी बँकेने पुढाकार घेतला आहे.


बँकेतील एका अधिकाऱ्याचा असाही प्रताप

थकीत कर्जदाराच्या वसुलीसाठी बँकेतील एक पथक गतवर्षी देऊळगाव गलांडे येथे गेले होते. येथील सिक्युरिटी ॲक्टखाली दुधाच्या प्लंॅटला सील ठोकले होते. परंतु कर्जदाराने बँकेतील एका अधिकाऱ्याला हताशी धरून पुन्हा सील उघडून प्लँट सुरू केला होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र बँकेतील ‘त्या’ अधिकाऱ्याने त्याकडे दुर्लक्ष करून अप्रत्यक्ष येथील कर्जदाराला सहकार्य केल्याचे दिसून येते. दरम्यान आता बँकेतील अधिकाऱ्यांनी बोगस कर्जदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पुढाकार घेतल्याने कर्जदारांचे चांगले धाबे दणाणून गेले आहेत. 

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only