Saturday, June 26, 2021

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणांमध्ये तीन डॉक्टरांना केली अटकनगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणांमध्ये तीन डॉक्टरांना केली अटक

नगर दि 26 प्रतिनिधी 


नगर अर्बन बँकेच्या पुणे जिल्ह्यातील पिंपरी शाखेमध्ये 22 कोटी रुपयांचा कर्ज प्रकरणातील फसवणूक व अपहार प्रकरणी काल पोलिसांनी नगर शहरातील तीन नामवंत डॉक्टरांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 जून पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.


आरोपींमध्ये डॉक्टर विनोद श्रीखंडे, डॉक्टर रवींद्र कवडे, डॉक्टर भास्कर सिनारे यांचा यामध्ये समावेश आहे.


नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अनेक घोटाळे उजेडात आले आहे. त्यापैकी हा एक घोटाळा उजेडात आला होता. बँकेच्या चिंचवड शाखेत  22 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासामध्ये निष्पन्न झाले होते. चिंचवड पोलिसांनी प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून २५ जानेवारीला भारतीय दंड संहिता कलम ३४, ४२०, ४६५, ४६७, ४६८ व ४७१ अन्वये कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण तसेच मंजूदेवी हरिमोहन प्रसाद, रामचंद्र तांबिले (सर्व रा. चिंचवड), अभिजीत नाथा घुले (रा. बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बँकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 


पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने या संदर्भात आठ जणांना अटक केलली आहे या प्रकरणामध्ये काहींना अटक पूर्व जामीन मिळालेले आहेत तर काहींना जामीन मंजूर झालेला आहे. सदर प्रकरणाचा तपास केल्यानंतर नगर येथील आशुतोष लांडगे याच्या नावावर अकरा कोटी रुपये यातील वर्ग झालेले होते, असे समोर आले होते. आशुतोष लांडगे ला अटक केल्यानंतर त्याने अनेक विषयाचा उलगडा केला होता. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला होता. सदरचे 11 कोटी रुपये हे कोणा कोणाला दिले होते व त्याचा वापर कशा पद्धतीने करण्यात आलेला होता, याचा तपास केल्यानंतर नगर येथील तीन डॉक्टरांचा यामध्ये समावेश असल्याचे तपासामध्ये उघड झाले. या डॉक्टरांच्या कडे सुमारे सव्वा सहा कोटी रुपये या प्रकरणातील वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.


त्यामुळे काल आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्याच्या पथकाने नगर येथे येऊन या तीन डॉक्टरांना ताब्यात घेतले होते व त्यांना काल रात्री अटक केल्यानंतर त्यांना आज पुणे येथे न्यायालयासमोर हजर केले असता 22 कोटींचा फसवणूक प्रकरणामध्ये यांचा समावेश असल्याचे उघड झालेले आहे, आम्हाला यांच्या खात्याची तसेच बँकेचे स्टेटमेंट सुद्धा घ्यायचे आहेत, या घटनेचा तपास आम्हाला करायचा आहे, या तीन डॉक्टरांच्या खात्यामध्ये पैसे कशा पद्धतीने कोणी टाकले, याचासुद्धा शोध घ्यायचा आहे व त्यांनी या पैशाचे काय केले, याचा सुद्धा पोलिसांना तपास करायचा आहे, त्यामुळे यांना पोलिस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने या तिन्ही डॉक्टरांना दिनांक 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.


चौकट


अर्बन बँकेच्या 22 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरण यासंदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली असल्याची माहिती विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिले असून या तीन डॉक्टरांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आता पुढील तपास सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only