Saturday, June 12, 2021

मराठा आरक्षणासाठी सर्व मार्गाने लढा देणार ..तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, विनायक मेटे यांचा इशारा नगर दिनांक 12 प्रतिनिधी


मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. आता समाजाला न्याय कशा पद्धतीने मिळेल याकरता आगामी काळामध्ये समाजाने काय भूमिका घ्यावी याकरता मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने पाच निवृत्त न्यायाधीशांच्या तज्ञांची सल्लागार समिती स्थापन केली जाणार असल्याचे क्रांती मोर्चा चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी काळामध्ये कायदेशीर लढाई, समाजमध्ये जागृती, नंतर विधिमंडळ संघर्ष अशी भूमिका आमच्या पक्षाने घेतली असून येत्या काळामध्ये जर सरकारने ठोस भूमिका जाहीर केली नाही, तर पावसाळी अधिवेशन सुद्धा आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. येत्या 27 जून रोजी आम्ही मुंबई येथे दहा हजार जणांची बाईक रॅली मुंबईमध्ये विधानभवनावर येणार असल्याचेही मेटे यांनी यावेळी सांगितल. जे जे मराठी नेते आमदार हे प्रत्येक पक्षांमध्ये आहेत, त्यांनी गांभीर्याने घ्यावे.  जर शासनाने पाच जुलै पर्यंत निर्णय घेतला नाही तर अधिवेशन चालू देऊ नका, त्यासाठी तुम्ही समाजाबरोबर नुसतेच बाहेर नाही तर आत मध्ये सुद्धा एकच राहा व आंदोलन करा, असेही मेटे म्हणाले.


नगर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी समितीचे राजन वाघ, सुरेश शेटे, नवनाथ इसरवाडे आदी  उपस्थित होते.


विनायक मेटे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण संदर्भात निकाल दिलेला आहे. आज समाज हा सैरभैर झालेला आहे. आगामी काळामध्ये समाजाला कशा पद्धतीने पुढे जायचे या करता दिशा देण्यासाठी आम्ही वेगवेगळे विषय हाती घेतलेले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये निवृत्त न्यायाधीश यांची कमिटी स्थापन करून आम्ही आगामी काळामध्ये कशा पद्धतीने संघर्ष करायचा याचा निर्णय त्या कमिटीच्या माध्यमातून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजाला ज्या सवलती दिल्या गेल्या पाहिजेत त्या हे सरकार द्यायला तयार नाही. तसेच आरक्षणाचा विषय सुद्धा गांभीर्याने घ्यायला तयार नाही. म्हणून आम्ही आता आंदोलनाचे हत्यार उपसले असून प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये आता मोर्चे काढणार असून त्याची सुरुवात लवकरच आम्ही करणार असल्याचेही मेटे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे भविष्याचे प्रश्न आता निर्माण झालेले आहे. त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. म्हणून आता जिल्ह्यामध्ये आम्ही मेळावे घेणार असून त्याची सुरुवात लवकरच करणार आहे. मात्र दुसरीकडे आज पुण्यापासून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागृती मोहीम सुरू केली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना  त्या वेळेस बापट आयोगाला आम्ही विरोध केलेला होता. त्या संदर्भात मी त्यांना लेखी पत्र दिले होते. त्यावेळेस सुद्धा माझे व त्यांचे शाब्दिक वाद झाले होते. आज या समाजाची मोठी वाताहत झाली आहे, असा आरोप सुद्धा मेटे यांनी यावेळी केला.


समाजाला मिळालेले हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं.  महाराष्ट्रातील आघाडी सरकारने व्यवस्थित मांडणी केली नाही. तयारी केली नाही आणि योग्य लोकांकडून योग्य बाजू मांडली नाही . म्हणून हे आरक्षण रद्द झालेलं आहे. मराठा समाजाच्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री तसेच मंत्री हे दिल्लीमध्ये पंतप्रधान यांची भेट घेण्यासाठी गेले . वास्तविक पाहता यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जातो, असे सांगितले. मात्र हे एवढेच नाही तर सतरा विषय घेऊन गेले. एक प्रकारे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा कांगावा केला आहे, असा आरोप सुद्धा मेटे यांनी केला.  तुम्ही दिल्लीत गेला मग काय झाले, हे जनतेला जाहीरपणे सांगा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


जसे देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांचे योगदान होते, तसेच आज मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा व समाजाचा प्रश्न हा स्वातंत्र्याच्या सारखाच ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे त्याचे नेतृत्व एकाने काय अनेकांनी करावे. त्यामुळे आमच्या मध्ये कोणतीही मतभिन्नता नाही व समाजाचे  नुकसानही होत नाही . जो तो आपापल्या मार्गाने आंदोलन करत असल्याचेही मेटे यांनी सांगितले. आमचे ध्येय समाजाला आरक्षण मिळावे एवढेच आहे, असेही त्यांनी संभाजी राजे यांच्या भूमिकेच्या विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तर दिले. तसेच मराठा समाजाने ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्यावे अशी कोणतीच भूमिका मांडलेली नाही व त्याचे आम्ही समर्थन सुद्धा करत नाही, असेही मेटे यांनी यावेळी सांगितले

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only