Friday, July 23, 2021

गोदा- भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारागोदा- भीमा पात्रात पाण्याचा विसर्ग

नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नगर,ता.23- आज सकाळी नांदूर मध्यमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरी नदीपात्रात 807 क्युसेक व भीमा नदीपात्रात 52 हजार 48 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीपत्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सखल भागात राहणार्‍या नागरिकांना तातडीने सुरक्षास्थळी स्थलांतरीत करावे. नदी, ओढे, नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र, ओढे, नाले यापासून दूर रहावे, सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन व दरड कोसळण्याची दाट शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणार्‍या लोकांनी काळजी घ्यावी. घाट रस्त्याने प्रवास करू नये. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नागरिकांनी पाण्यात उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

चौकट

धरणांतून विसर्ग (क्युसेकमध्ये)

भंडारदरा- 849 (टनेलव्दारे वीज निर्मितीसाठी)

नांदूर मध्यमेश्‍वर- 807

भीमा दौंड पूल- 52048


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only