Thursday, July 29, 2021

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलिस अधीक्षक मनोज पाटील स्वतः रस्त्यावर


नगर : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि तिसरी लाटेचा धोका ओळखून शहरात निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलिस अधीक्षक मनोज पाटील स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. शहरात तपासणी करुन प्रशासनाकडून सक्त कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी भोसले यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी भोसले व पोलिस अधीक्षक पाटील यांनी शहरातील चितळे रोडसह कापड बाजार व इतर परिसरांमध्ये पाहणी केली. वैद्यकीय सेवा देणार्‍या आस्थापनांचीही त्यांनी जाणीवपूर्वक पाहणी करुन वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त इतर वस्तूंची विक्री होतेय का, याचीही तपासणी केली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, यापुढे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे. पार्सल सुविधा उपलब्ध असलेल्या हॉटेल्सवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तिसरी लाट सुरू झाली आहे. रुग्णसंख्या हळू हळू वाढत आता बाराशेपर्यंत गेली आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर वापरुन सोशल डिस्टन्सचे पालन करावे.

मी अन्य अधिकार्‍यांसोबत जिल्ह्यात फिरतो आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर, पारनेर तालुक्यातील पळशीलाही भेट दिली. तेथील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी 31 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पाथर्डी, शेवगाव व राहुरी तालुक्यांतही काही ठिकाणी अशीच अवस्था आहे. तेथे योग्य कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

नगर शहरात कापड बाजार परिसरात मोठी गर्दी होते. परंतु, कोरोनाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी महापालिकेचे कर्मचारी खबरदारी घेत आहेत. कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांवर पोलिसही कारवाई करीत आहेत. प्रशासन कारवाईत कोठेही कमी पडणार नाही. मात्र, नागरिकांनीच सतर्क होऊन स्वत:ची व समाजाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी भोसले यांनी केले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only