Saturday, July 31, 2021

प्रशासन सतर्क; यंत्रणेला कडक कारवाईचे आदेश सावधान: करोनाची तिसरी लाटप्रशासन सतर्क; यंत्रणेला कडक कारवाईचे आदेश

सावधान: करोनाची तिसरी लाट

नगर,ता.31-जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात करोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले. करोना नियमांसदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश डॉ. भोसले यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.

नगर जिल्ह्याने गेल्या वर्षी पहिल्या लाटेचा सामना केला तर यावर्षी एप्रिल-मे महिन्यात आलेली दुसरी लाट भयावह होती. या लाटेने आरोग्य यंत्रणा तुटपुंजी असल्याचे सिध्द केले होते. या कालावधीत बेडची कमतरता आणि ऑक्सिजनची प्रचंड टंचाई होती.  दुसर्‍या लाटेत मृत्यूचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा अधिक होते. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात रूग्ण संख्येत वाढ होत आहे. दररोजची ही संख्या सातशेच्या पुढे आहे. जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने नगर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल न करता ते निर्बंध कायम ठेवले आहेत. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी संगमनेर, पारनेर, पाथर्डी तालुक्यातील गावांना भेटी दिल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये पोलिस यंत्रणेने कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. लग्न समारंभ हे करोना वाढीचे मुख्य कारण ठरत असल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभात ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होत नसेल तर नवरदेव, नवरी, आई वडिलांसह मंगल कार्यालय मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शनिवारी व रविवारी दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई करून दुकाने महिनाभरासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, 30 जुलै अखेर जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 2 लाख 98 हजार 160 इतकी असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 86 हजार 308 आहे. उपचार सुरू असलेली रूग्ण संख्या 5 हजार 687 इतकी आहे. 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only