Saturday, July 3, 2021

गोपीचंद पडळकर फक्त राजकारण करतात.. जय मल्हार सेनेच्या शेवाळे यांचा टोलानगर दि 3 प्रतिनिधी


बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका म्हणणारे गोपीचंद पडळकर आता ती शपथ बाजूला सारून म्हणजे बिरोबाला बाजूला सारून त्यांनी भाजपात  प्रवेश केला व आमदारकी मिळवली. आता पुढचं काय पाहिजे असेल, गोपीचंद पडळकर काहीही करू शकतो आणि तो त्यांचा राजकीय भूमिकेच्या प्रश्न आहे. मला त्याबद्दल काही बोलायचे नाही, ते फक्त राजकारण करतात, असा टोला जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी लगावला.

दरम्यान, धनगरांच्या  आरक्षण संदर्भात येत्या आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नासंदर्भात चर्चा करणार आहोत. त्या चर्चेत काय होते ते पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


जिल्हाध्यक्ष प्रदीपराज भोंडे, दत्तात्रय वीर, राजेंद्र शिंदे, गणेश शिंदे, अशोक काळे, अरुण कर्डीले, शंकर भाकरे, आसाराम कर्डीले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.राज्य सरकारमध्ये आज धनगर समाजाच्या आरक्षण चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. भारतीय घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. ते देण्याबाबत सरकार आपल्या तोंडातून ब्र शब्द काढत नाही. म्हणून येत्या काळामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक लावण्यासाठी थोरात यांनी पुढकार घेतला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत तत्परतेने पावले उचलावीत, अशा प्रकारची संघटनेने भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने पावले उचललीत. याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज हा एकत्र आहे. म्हणून येत्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका. किमान धनगर समाजाच्या प्रश्नावर चर्चा करून त्याला गती तरी द्या, एवढेच आवाहन आम्ही जय मल्हार सेनेच्या वतीने सरकारकडे करत असल्याचे शेवाळे म्हणाले.


शेवाळे म्हणाले की, येणाऱ्या चार महिन्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाची ज्या गावात वस्ती त्या गावांमध्ये जय मल्हार सेनेची शाखा उघडण्यात येणार आहे. 


सगळीकडे कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे धनगर समाज सध्या शांत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी ज्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत, त्याचप्रमाणे धनगरांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आमची राज्य सरकारकडे असणार आहे, असे ते म्हणाले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only