Tuesday, July 6, 2021

पोलीस कर्मचारी व किरण काळे यांच्यात खडाजंगी

 

नगर दि 6प्रतिनिधी : नगरमध्ये रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे महापालिकेच्या आवारात आंदोलन करत असताना पोलीसअधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी, अरेरावी, करण्याचा प्रकार शहर काँग्रेसच्या मोर्चात मंगळवारी घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान, या प्रकरणात संदर्भामध्ये पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर  गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली.नगर शहरात रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे, त्याचबरोबर डीपी रस्त्यांच्या कामांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मनपावर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आसूड मोर्चा काढत मनपाला जाब विचारण्यात आला. यावेळी काँग्रेस आंदोलकांनी महानगरपालिकेच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोतराजांसह किरण काळे यांनी मनपावर आसूड उगारत मोर्चाचे नेतृत्व केले. टॉप अप पेट्रोल पंपापासून सुरू झालेला मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. त्यावेळी महानगरपालिकेचा आवार आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेले होता. आंदोलकांच्या हातांमध्ये महानगरपालिकेच्या निषेधाचे फलक झळकत होते. काँग्रेसचे झेंडे देखील फडकत होते. 


यावेळी मोर्चाला संबोधित करताना किरण काळे म्हणाले की, महानगरपालिकेने गाढ झोपेचे सोंग घेतले आहे. मनपातील सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी दररोज शहरातील रस्त्यांवरून जा-ये करत असतात. त्यांना रस्त्यांवर पडलेले खड्डे दिसत नाहीत का ? नागरिकांकडून कर संकलन करण्यासाठी मनपाकडून दारामध्ये वाजंत्री पाठविली जाते. आता नागरिकांच्या खड्डेमुक्त शहराच्या हक्कासाठी आम्ही पोतराज आणि वाजंत्री घेऊन महापालिकेच्या दारात महापालिकेला झोपेतून उठविण्यासाठी आलो आहोत, असे सांगून ते म्हणाले, नगर शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत. अनेक कामे प्रलंबित आहेत. त्याचबरोबर डीपी रस्त्यांचा प्रकल्प देखील बासनात गुंडाळून पडला आहे. ही सर्व कामे मनपाने तातडीने हाती घेत त्या दृष्टीने पावले उचलावीत. अन्यथा नगरकरांच्या संयमाचा उद्रेक होईल असा इशारा यावेळी काळे यांनी दिला. 

काळे यांनी यावेळी आरोप केला आहे की शहरातील ठराविक ठिकाणी वारंवार खड्डे पडतात आणि ते खड्डे वारंवार बुजवले जातात. असे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना महानगरपालिका काळ्या यादीत का टाकत नाही ? का संगनमताने महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे ? असा सवाल यावेळी काळे यांनी उपस्थित केला.


उपायुक्त आले बाहेर

मनपाचे उपयुक्त यशवंत डांगे यांनी काँग्रेसचे निवेदन बाहेर येऊन स्वीकारले. काँग्रेसच्या मागण्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. यावेळी ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद आदींची भाषणे झाली. शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद यांनी मोर्चाचे सूत्रसंचालन केले.


यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, एससी विभागाचे नाथा अल्हाट, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख,  इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, विद्यार्थी नगर तालुकाध्यक्ष सुजित जगताप, सचिव प्रशांत वाघ, सागरदादा काळे, माजी नगरसेविका जरीना पठाण, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शारदा वाघमारे, नलिनी गायकवाड, उषाताई भगत, कल्पना खंडागळे, सेवादल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, ऋतिक लद्दे, लखन छजलानी, रावसाहेब काळे, दीपक चांदणे, साईनाथ बोराटे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने, आसाराम पालवे, राहुल गांधी विचार मंचचे सागर ईरमल, सचिव ॲड. सुरेश सोरटे, सहसचिव शंकर आव्हाड, सिद्धार्थ झेंडे, अविनाश धनगर, राणी पंडित, शबाना बागवान, रिजवाना शेख, युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ठोंबरे, शरीफ सय्यद, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोसिम शेख, इम्रान बागवान, अजय मिसाळ, विशाल घोलप, अक्षय पाचरणे आदी उपस्थित होते.चौकट 

आयुक्तांचा निषेध

उपायुक्त यशवंता डांगे यांनी बाहेर येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. उपायुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र आयुक्त स्वतः बाहेर न आल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुक्तांचा निषेध केला. 


चौकट ३ : 

पोलिसांचा अपमान,गुन्हा होणार


मोर्चा बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक सोळंके यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली. तसेच पोलीस खात्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी केले, त्यामुळे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, 

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only