Monday, July 19, 2021

नगर शहरातील एका सराफासह सराईत गुन्हेगार अटकेत; कोतवाली पोलिसांची कारवाईनगर शहरातील एका सराफासह सराईत गुन्हेगार अटकेत; कोतवाली पोलिसांची कारवाई

नगर : सोने लुटणार्‍या एका सराईत गुन्हेगारासह नगर शहरातील चोरीचे सोने विकत घेणार्‍या एका सराफासही कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आणखी चार सराफ व्यावसायिकांची कोतवाली पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती  पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली. कोतवाली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराकडून 7 गुन्ह्यांची उकल केली आहे.

16 हजारांची रोकड व दोन मोबाईल चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात 12 जुलैला गुन्हा दाखल झाला होता. कोतवाली पोलिसांनी 13 जुलैरोजी ज्ञानदेव हरिभाऊ चेडे (रा.पुणेवाडी, ता.पारनेर हल्ली रा. नगर-दौंड रोड) यास ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून तपासादरम्यान शहरात फसवणूक करुन सोने लुटल्याच्या सात गुन्ह्यांची उकल झाल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. चेडे याने चोरीचे सोने माळीवाडा येथील विलास सुखदेव बुर्‍हाडे या सराफास विकल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. चेडे याने सुमारे 12 ते 15 तोळे सोने बुर्‍हाडे याला विकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बुर्‍हाडे याने विकत घेतलेले चोरीचे सोने त्याने शहरातील चार सराफ व्यावसायिकांना विकल्याचे तपासात सांगितले आहे. या प्रकरणी शहरातील चार सराफ व्यावसायिकांची चौकशीही मागील काही दिवसांत करण्यात आली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only