Thursday, July 1, 2021

जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर खासगी फायनान्समधून 5 लाख कर्ज; पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस कर्मचार्‍याने पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर खासगी फायनान्समधून 5 लाख 40 हजार रुपये कर्ज घेऊन विल्हेवाट लावत न्यायालयाचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक गणेश नामदेव शिंदे (नेमणूक ः नगर तालुका पोलिस ठाणे), याच्या विरोधात कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई करून पोलिसांनी सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला होता. सदरचा मुद्देमाल हा जप्त केल्यानंतर तो पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कारकून यांच्याकडे ठेवण्यात येत असतो. तो जप्त केलेला मुद्देमाल हा न्यायालयामध्ये दाखल करायचा असतो. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचा ऐवज हा नगर तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात असतानाच पोलीस कर्मचारी गणेश शिंदे याने सदर सोन्याचा मुद्देमाल हा एका फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी 5 लाख  40 हजार 640 रुपये कर्ज घेतले व स्वतः या रकमेचा वापर केला. न्यायालयाचा विश्वासघात करुन फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.


सपोनि राजेंद्र सानप यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये संबंधित पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध कलम 406 ,408 409 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच संबंधित आरोपी याने अजून काही रकमेचा अपहार केलेला आहे, असेही समजते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे.


या संदर्भामध्ये  कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख यांनी 29 जून रोजी या संदर्भात गुन्हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only