Saturday, July 31, 2021

शेवगावात नगरसेवकांसह चौघांवर गुन्हा दाखल अर्बन बँकेत पतीला नोकरी देतो म्हणुन महिलेची फसवणूकशेवगावात नगरसेवकांसह चौघांवर गुन्हा दाखल   अर्बन बँकेत पतीला नोकरी देतो म्हणुन महिलेची फसवणूक


नगर दि 31 प्रतिनिधी

         नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखा व्यवस्थापकाच्या आत्महत्येकची घटना ताजी असतांनाच अर्बन बँकेत पतीस नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले, मात्र नोकरी लावली नाही.

घेतलेल्या पैशाचा तगादा केला असता मागासवर्गीय महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याचा आरोपावरुन शेवगाव नगरपरीषदेचे नगरसेवक कमलेश गांधी याच्यासह चार जणांविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात अँट्राँसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.कमलेश गांधी (रा. शास्त्रीनगर, शेवगाव), ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी (तिघे रा. देशपांडे गल्ली, शेवगाव) यांचा आरोपी मध्ये समावेश आहे.

 याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2013 मध्ये आमच्या शेजारी राहणारे ललिता तापडीया व कमलेश गांधी यांनी माझ्या पतीस अर्बन बँकेत नोकरीला लावून देतो. असे म्हणून माझ्या सासूकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. त्यातील पाच लाख 50 हजार रुपये रोख घेतले होते. उर्वरीत रक्कमेसाठी बँक आँफ महाराष्ट्राचे तीन कोरे धनादेश घेतले होते. त्यानंतर माझे पती यांना नोकरीस लावून न दिल्याने आमच्यात वाद झाले.


 त्यानंतर ललिता तापडीया हीने माझ्या पतीविरुध्द धनादेश न वटल्याचा गुन्हा न्यायालयात दाखल केला. दि. 15 मार्च 2021 रोजी सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान मी घरात एकटीच असतांना कमलेश गांधी (रा. शास्त्रीनगर, शेवगाव), ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी (तिघे रा. देशपांडे गल्ली, शेवगाव) यांनी माझ्या घरी येवून मला जातीवाचक शिवीगाळ केली. 


‘तुम्हाला जास्त झाले काय, तुमचा खून करु’, असे कमलेश गांधी, शरद जोशी, जगदीश तापडीया म्हणू लागले. त्यावर ललिता तापडीया हीने माझ्या केसाला धरुन ओढत माझ्या तोंडावर चापट मारुन आमच्या नादाला लागू नकोस, असे म्हणत आम्ही घरासकट तुम्हाला जाळून टाकू, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. व जगदीश तापडीया व गांधी यांनी माझ्या छातीवरील साडीचा पदर ओढला व माझी साडी फेडण्याचा प्रयत्न करुन मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करु लागले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यामुळे मी घराजवळील हॉस्पीटलमध्ये जावून उपचार घेतला.


 दरम्यान या प्रकरणातील चार जणांवर गुन्हा दाखल होत नसल्याने पिडीत महिला व तिचे कुटूंबीय दोन दिवसांपासून पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसले होते. त्यामुळे शुक्रवार दि. 30 रोजी रात्री उशीरा शेवगाव पोलिसांनी उपोषणाची दखल घेवून कमलेश गांधी, ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी यांच्याविरुध्द अनुसुचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3 (1) तसेच भादंवि कलम 452, 354, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे करत आहेत. या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only