Tuesday, July 13, 2021

गाडी पासिंगच्या बहाण्याने तोतया एजंटने घातली माजी सैनिकाला टोपी


गाडी पासिंगच्या बहाण्याने तोतया एजंटने घातली माजी सैनिकाला टोपी


नगर : केडगाव भुषणनगर येथील एका माजी सैनिकास आरटीओ कार्यालयाच्या आवारातील एका तोतया एजंटने गाडी पासिंग करुन देण्याच्या बहाण्याने 92 हजारांना गंडविले. आज 13 जुलै रोजी ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाडुरंग नाना साठे (वय ४१, धंदा. रिटायर, रा. सावली सोसायटी, केडगाव, भूषणनगर, अहमदनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. साठे यांनी फिर्यादीत म्हटले की, मी सेवानिवृत्त होण्याअगोदर अयोध्या (जि. फैजाबाद, उत्तरप्रदेश) या ठिकाणी नेमणुकीस असताना ९.१०.२०२० रोजी टाटा अल्ट्रोज ही पांढर्या रंगांची गाडी खरेदी केलेली आहे. गाडी खरेदी केल्यानंतर मला सदर गाडी ही महाराष्ट्र येथील अहमदनगरमध्ये पासिंग करावयाची असल्याने, मी सदर ठिकाणी तिचा रोड टॅक्स भरलेला नव्हता. तसेच मला सदर ठिकाणी टेम्पररी पासिंग नंबर (यूपी-४२/पीसी ०२१६) मिळाला होता. मी  १.१०.२०२० रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर बुकींग केलेली गाडी ताब्यात घेऊन अहमदनगर मध्ये ११.१०.२०२१ रोजी आलो. त्यानंतर गाडी पासिंग करावयाची असल्याने आरटीओ ऑफीस चांदणी चौक येथे ३०.११.२०२० रोजी गेलो. गाडी पासिंग करणबाबत चौकशी करत असताना मला महेश अर्जुन खेडकर हा एजंट भेटला. गाडी उत्तरप्रदेश येथुन नगर पासिंग करावयाची आहे, असे सांगितले. त्यावेळी त्याने कागदपत्रे मागितल्यावर मी उत्तरप्रदेशवरुन आणलेले पेपर व इन्शुरन्स पेपरची झेरॉक्स कॉपी दिली. पासिंग करण्यासाठी ८५००० रुपये खर्च सांगितल्याने, मी त्यास पंच्याऐशी हजार रुपये रक्कम असलेला स्टेट बँक ऑफ इंडिया दिल्लीगेट शाखेचा चेक दिला. त्यानंतर मी वेळोवेळी महेश अर्जुन खेडकर याचेकडे फोन करून गाडी पासिंगबाबत विचारणा करीत होतो. परंतु महेश अर्जुन खेडकर हा  वेळ मारुन नेत होता. त्यानंतर त्याने मला २०.१२.२०२० रोजी गाडीचा नंबर एमएच १६ सीव्ही ९६९० असा नंबर दिला. त्यानंतर त्याने मला आरसी बुकसाठी व इतर कामासाठी आणखी पैशाची मागणी केल्याने १७.०१.२०२१ रोजी फोन पे द्वारे ४००० व १९.०१.२०२१ रोजी फोन पे द्वारे ३००० असे पैसे पाठविले. त्यानंतर मी गाडीस एमएच १६ सीव्ही ९६९० हा नंबर लावून गाडी वापरत होतो. परंतु मी गाडीचा नंबर हा ऑनलाईन चेक करत असताना मला माझा नंबर दिसत नसल्याने, मी महेश खेडकर यास फोन करुन विचारले असता, तो मला म्हणाला की, गाडीचे आरसी बुक पोष्टाने घरी येईल. त्यानंतर मी पुन्हा ऑनलाईन चेक केले. गाडीचा नंबर दिसत नसल्याने मी महेश खेडकर यास फोन केला असता, तो फोन उचलत नसल्याने मला संशय आला. मी त्याचे घरी जावून पाहणी केली असता तो घर सोडून कोठेतरी गेला असल्याचे घरातील लोकांनी सांगितले. त्यानंतर १३.७.२०२१ रोजी सकाळी ११.०० चे सुमारास आरटीओ ऑफीस मध्ये जावून गाडीच्या पासिंगबाबत चौकशी केली असता, मला अर्जुन खेडकर याने दिलेला नंबर हा बनावट असल्याचे सांगितले. तसेच इतर लोकांकडुन समजले की, महेश अर्जुन खेडकर हा व्यक्ती फसवणुक करतो, असे समजले आहे. त्या मुळे पासिंगसाठी महेश अर्जुन खेडकर (रा.संत वामनभाऊ नगर, पाथर्डी, जि अ.नगर) याने चेकद्वारे व फोन पे द्वारे एकुण रक्कम ९२००० रुपये घेवून बनावट नंबर देवून  फसवणुक केल्या प्रकरनी साठे यांच्या फिर्यादीवरुन कलम 420 अन्वये कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only