Thursday, July 8, 2021

वांबोरीला विहिरीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

 राहुरी  तालुक्यातील वांबोरी  येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह वांबोरी परिसरातील विहिरीतील  पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. एवढ्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात? याबद्दल परिसरामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.


बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या घरापासून बेपत्ता झालेली किरण गणेश पाठक  (वय 13 वर्ष) ही मुलगी बेपत्ता  झाली होती. दरम्यान, परिसरात सगळीकडे शोध घेऊन तपास केला असता कुठेही मिळून आली नाही. त्यानंतर रात्री आठच्या दरम्यान वांबोरी दूरक्षेत्र येथे बेपत्ता मुलीचे वडील गणेश (दत्ता) मनोज पाठक  यांनी वांबोरी पोलीस दूरक्षेत्रामध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ शोध घेण्यासाठी राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ , पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ  यांच्यासह पोलीस हवालदार चंद्रकांत बर्‍हाटे, पोलीस हवालदार दिगंबर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन बेपत्ता किरणचा शोध सुरू केला. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वांबोरी- विळद रस्त्याच्या कडेला भारत जाधव यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. 

मयत किरण पाठक हिचा मृतदेह विहिरीतून वर काढून उत्तरीय तपासणीसाठी वांबोरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only