Saturday, July 24, 2021

ई - टपाल प्रणालीमुळे पोलिसांच्या सेवा नागरिकांना मिळणार जलद

 


नगर दिनांक 24 प्रतिनिधी


नगर जिल्हा पोलीस दलामध्ये दिनांक १० फेब्रुवारी २०२१ पासुन ई-टपाल ही संगणकीय कार्यप्रणाली सुरु करण्यात आली असुन, या कार्याप्रणालीमुळे नगर जिल्हा पोलीस दलामध्ये केले जाणारे टपालेचे देवाण-घेवाण ऑनलाईन पध्दतीव्दारे जलद गतीने झाले आहे. सदर ई-टपाल कार्यप्रणालीचा वापर करून नवीन आलेली, प्रलंबित, प्रक्रियेत असलेली व कार्यवाही पूर्ण झालेले टपालावर नियंत्रण ठेवता येते. तसेच सदर ई-टपाल प्रणालीमुळे नागरिकांनी केलेल्या अर्जावर विहित मुदतीत तात्काळ सेवा देता येत असल्याने पोलीस प्रशासनातील कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम झाले आहे. नगर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय पातळीवर 90 टक्के टपाल ई टपालाद्वारे होत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनील कटके, सायबर सेलचे प्रमुख प्रतीक कोळी आदी यावेळी उपस्थित होते.


अधीक्षक पाटील म्हणाले की, ई-टपाल प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाखा व पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना युजर आयडी दिला आहे. त्यांना टपाल प्राप्त झाल्यास त्यांचे कडून त्या टपालावर कार्यवाही केली जाते. ज्या टपालावर अद्याप कार्यवाही केली नाही असे टपाल प्रलंबित दिसतात. डॅशबोर्डवर कोणत्या पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , शाखा यांच्याकडे टपाल प्रलंबित आहेत व किती दिवसांपासून प्रलंबित आहे याबाबतचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवलोकन करता येत असल्याने पोलीस प्रशासनात अधिक कार्यक्षमता निर्माण झाली आहे.


जिल्ह्यामध्ये टपालचे 90 टक्के काम या प्रणालीद्वारे झालेले आहे. या टपालमुळे कार्यालयीन कामकाजातील विषय समजून आलेले अर्ज हे कशा पद्धतीने निकाली काढता येतील, यासाठी त्याचा उपयोग झाला आहे. 


नगर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी ते आजपर्यंत लोक सेवेतील 17864 अर्ज प्राप्त झाले असून यातील फक्त केवळ सातच अर्ज प्रलंबित राहिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


नगर जिल्ह्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आलेली अनेक प्रकरणे निकाली लावली आहेत. एकतीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 22 हजार 719 अर्ज प्राप्त झालेले होते. यामध्ये 99 हजार 98 अर्ज हे निकाली काढण्यात आली असून 23 हजार 621 अर्ज प्रलंबित असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. तर दुसरीकडे डीवायएसपी कार्यालयामध्ये 39 हजार 16 टपाल आले होते. त्यातून 28 हजार 942 टपाल हे निकाली काढण्यात आलेले असून, 6174 टपाल हे शिल्लक राहिलेले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये सरासरी रोज 1200 टपाल पोलिसांकडे प्राप्त होत आहे. तर दुसरीकडे विनाकारण टपाल वाढत चालल्याचे सुद्धा प्रकार दिसून येत आहे. त्याची टक्केवारी 20 टक्के एवढी असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

ही प्रणाली सुरू केल्यानंतर अकराशे अर्ज हे गायब झाले असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. सर्व माहिती एकत्रित केल्यानंतर हे ज्याच्या विभागाकडे ते अर्ज प्रलंबित होते त्यांना ते टपाल शोधून निकाली लावण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.


ही प्रणाली लागू करणारे जिल्ह्यातील पोलीस दल हे राज्यातील एकमेव असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.


चौकट


ई- टपाल कार्यप्रणाली मुळे होणारे फायदे होतात


सर्व टपाल सॉफ्ट कॉपीमध्ये असल्याने ते गहाळ होत नाही. सर्व टपाल ऑनलाईन आवक जावक करता येत असल्याने मनुष्यबळ व वेळेची बचत होते. ई-टपाल प्रणालीमुळे कामकाज सुटसुटीत झाल्याने ताण तणाव कमी होण्यास मदत होते. ई-टपाल मधील ट्रॅकिंग सिस्टीम मुळे टपाल सध्या कोणत्या टप्प्यावर प्रलंबित आहे हे समजून येते. टपालाची सद्यस्थीति दिसून येत असल्याने दप्तर दिरंगाई टाळता येते.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only