Monday, July 12, 2021

सारोळा कासार सेवा सोसायटीची शंभर टक्के वसुली

सारोळा कासार सेवा सोसायटीची शंभर टक्के वसुली


नगर- नगर तालुक्यातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या सारोळा कासार विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सन २०२० - २१ या आर्थिक वर्षात बँक पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली झाली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संजय काळे, व्हाईस चेअरमन सौ. मनिषा कडूस यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना सचिव महादेव ठाणगे यांनी सांगितले की, संस्थेच्या वतीने शेतकरी सभासदांना पीक, कर्ज, भुसार कर्ज, खेळते भांडवल कर्ज असे विविध प्रकारचे कर्ज वितरण मागील आर्थिक वर्षात करण्यात आलेले होते. या वर्षी कोरोनाची परिस्थिती असताना देखील संस्था आर्थिक डबघाईस येऊ नये म्हणून चेअरमन श्री.संजय काळे यांना सहकार क्षेत्रात असलेल्या कामाचे अनुभवामुळे व वेळोवेळी मिटिंग घेऊन कर्ज वसुली संदर्भात  सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे संस्थेची शंभर टक्के कर्ज वसुली बँक पातळीवर झाली आहे. 

ही वसुली व्हावी या साठी संस्थेचे चेअरमन संजय काळे व ज्येष्ठ संचालक, शिक्षकनेते संजय धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज वसुली संदर्भात ४ बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये वसुली वाढविण्यावर विविध अंगाने चर्चा करत सर्व संचालक मंडळाला कर्जदार सभासदांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना कर्जाचा भरणा करण्यासाठी आवाहन केले. त्यानुसार संचालक बाळकृष्ण धामणे, गोरक्षनाथ काळे, महेश धामणे, जयप्रकाश पाटील, बापूराव धामणे, नानासाहेब कडूस, बाळासाहेब धामणे,  शिवाजी वाव्हळ, चंद्रभान जाधव, सौ.कमल कडूस आदींनी कर्ज वसुली साठी प्रयत्न केले असे सचिव महादेव ठाणगे यांनी सांगितले. तसेच कर्ज वितरण किंवा नवीन कर्ज सभासदांना देणेसंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनीही वेळोवेळी संचालक मंडळास मार्गदर्शन तसेच बँक पातळीवर मदत केली असल्याचे  चेअरमन संजय काळे यांनी सांगितले.

शंभर टक्के वसुली झाल्यामुळे जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री.शेळके यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संस्थेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only