Friday, July 9, 2021

नगर अर्बन बँकेतील 22.90 कोटींच्या फसवणूक प्रकरणी डॉ. नीलेश शेळकेला अटकनगर अर्बन बँकेतील 22.90 कोटींच्या फसवणूक प्रकरणी डॉ. नीलेश शेळकेला अटक

नगर अर्बन बँकेच्या 22.90 कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने डॉ. नीलेश शेळके याला अटक केली आहे. अटकेत असलेल्या शेळके याला आता या नवीन गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. न्यायालयाने शेळकेला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी दिली.


बँकेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार डॉ. नीलेश शेळके, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, स्पंदन हेल्थकेअरचे जगदीश कदम यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. नगर अर्बन बँकेतून डॉ.शेळके, डॉ. सिनारे, डॉ. श्रीखंडे यांच्या नावावर प्रत्येकी 5 कोटी व डॉ. कवडे यांच्या नावावर 7.90 कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. मशिनरी खरेदीसाठी कर्ज घेण्यात आले होते. मात्र, या रकमेतून मशिनरी खरेदी न करता कर्जाची रक्कम इतरत्र वापरल्यामुळे बँकेची फसवणूक झाल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता.


डॉ. शेळके हा सध्या इतर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. त्याला आर्थिक गुन्हे शाखेने 22.90 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटक करुन वर्ग करण्यात आले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. कर्जाच्या रकमेचा वापर कसा झाला? ही रक्कम कुणाकडे गेली, कुणाच्या खात्यात रकमा वर्ग झाल्या, यात आणखी कुणाचा समावेश आहे, याचा सर्व तपास करायचा असल्याने पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने शेळके याला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only