Saturday, July 3, 2021

त्या डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले




 नगर- दि 4 प्रतिनिधी- नगर अरबन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटी रुपयांचा आर्थिक फसवणूक प्रकरणातील पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केलेल्या नगरच्या तीन डॉक्टर यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहे. या आरोपीमध्ये डॉ. भास्कर सिनारे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे यांचा समावेश आहे.


बँकेचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील शाखेतील 22 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा विषय चांगलाच गाजला आहे. या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आत्तापर्यंत आठ जणांना या प्रकरणांमध्ये अटक केली होती.  त्यामध्ये वरील नगरच्या तीन डॉक्टरांचा सुद्धा समावेश होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या आशुतोष लांडगे याच्या खात्यामध्ये अकरा कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले होते त्यातील सहा कोटी चार लाख रुपये ही रक्कम या तीन डॉक्टरांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती. लांडगे याच्या तपासामध्ये ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या तीन डॉक्टरांना नगर येथून अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत दिनांक 30 जून रोजी संपल्यानंतर त्या तीनही डॉक्टर आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या तीनही आरोपींनी न्यायालयामध्ये वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता.


या जामीन अर्ज संदर्भामध्ये आक्षेप घेताना पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे, यामध्ये 22 कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. ही रक्कम कोणाकोणाला कशा स्वरूपामध्ये दिलेली आहे, हे तपासामध्ये उघड झालेले आहे. त्यामुळे या रकमेच्या संदर्भात अन्य आरोपींचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत. या घटनेचा तपास अजून पूर्ण व्हायचा आहे, त्यामुळे यांना जामीन देऊ नये, असे लेखी म्हणणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने न्यायालयामध्ये सादर करण्यातआले. त्यानंतर या तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.


दरम्यान तीन डॉक्टरांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या नगर शाखेकडे सुद्धा यातील आरोपींविरुद्ध 3 कोटीच्या चिल्लर घोटाळ्याचा गुन्हा दाखल आहे, त्यामुळे आता येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग पुढील काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे होणार आहे. या तिन्ही डॉक्टरांना नगरच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक केली जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only