Saturday, August 7, 2021

तपोवन रस्त्यावरील घटना भीषण आगीत 7 गाळे खाक



तपोवन रस्त्यावरील घटना भीषण आगीत 7 गाळे खाक



नगर दि. 7- येथील तपोवन रस्त्यावर एका ओपन प्लॉट मध्ये बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या गाळयामध्ये आग लागून मोठे नुकसान झाले. शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी हजर होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मनपाच्या अग्निशमन बंबासह एमआयडीसीच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. आग मोठी असल्यामुळे शेजारी असलेले सहापैकी सुमारे चार गाळे आगीत पूर्णपणे भस्मसात झाले. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान, आग लागल्यामुळे याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तर दुसरीकडे काही स्थानिक नागरिक, दुकानदार, नगरसेवक सुनील त्रिम्बके, माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दुकानातून सामान वाचवण्यासाठी नागरिकांना सहकार्य केले. नागरिकांची गर्दी वाढत असल्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तोफखाना पोलिसांनी काही प्रमाणात बळाचा वापर करून नागरिकांना पांगवले. तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सुरज मेढे आदींसह तोफखाना पोलिसांचे कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत बाजूला करत होते.

सुमारे दोन ते अडीच तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत रामेश्वर ट्रेडर्स, श्रेया लेडीज शॉपी यासह आणखी दोन ते तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. शेजारील दुकानाला ही आगीची झळ बसण्यास सुरुवात झाल्यामुळे स्थानिक नागरिक नगरसेवक व पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदत करून दुकानातील साहित्य वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only