Monday, August 23, 2021

सादिकच्या मृत्यूप्रकरणी तीन पोलिसांचे निलंबन


 नगर दि 23 प्रतिनिधी- पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक लाडलेसाब बिराजदार हा पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिस गाडीतून पडून जखमी होऊन मरण पावल्याने आरोपी सांभाळण्याच्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांच्यासह ज्यांच्या ताब्यात सादिक होता ते सहायक फौजदार मैनुद्दीन इस्माईल शेख (वय 55) व पोलिस नाईक अंबादास पालवे या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे.


भिंगार पोलिस ठाण्यातच दाखल असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी सादिक बिराजदार याला 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहायक फौजदार शेख व पोलिस नाईक पालवे यांनी ताब्यात घेऊन ते त्याला भिंगार पोलिस ठाण्यात घेऊन येत असताना भिंगार नाल्याजवळ त्याने त्यांच्या ताब्यातून पळण्याचा प्रयत्न केला. यात तो गाडीतून खाली रस्त्यावर पडल्याने जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात सहा दिवस उपचार सुरू होते. त्यात त्याचे निधन झाले. या प्रकरणी पोलिस अधीक्षक पाटील यांनी उपअधीक्षक विशाल ढुमे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांच्या चौकशीच्या प्राथमिक निष्कर्षातून सादिक पोलिसांच्या ताब्यात असताना पळण्याच्या प्रयत्नात जखमी होऊन मरण पावल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपी सांभाळण्याच्या कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, सहायक फौजदार शेख व पोलिस नाईक पालवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only