Tuesday, August 31, 2021

दुचाकी चोरणारे चौघे गजाआड; कोतवाली पोलिसांची कारवाई

 


दुचाकी चोरणारे चौघे गजाआड; कोतवाली पोलिसांची कारवाई

नगर दि 31 प्रतिनिधी


नगर शहरातील मोटर सायकल चोरी करुणन त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणांमध्ये चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली.


आरोपीमध्ये गणेश देविदास नल्ला (वय २३, रा. श्रमिकनगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर), हनुमत राजेंद्र गायकवाड (वय २०, रा. मुंगुसवाडी खरवंडी ता. पाथर्डी),  दिपक बाळू कांबळे (वय २६, रा. मोकाशे वस्ती, कादंबरी नगरी, पाईपलाईन रोड, अहमदनगर),  शिवाजी सोन्याबापु साबळे (वय ३१, रा . तपोवन रोड शिवाजीनगर, नगर) यांचा समावेश आहे.


कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रकार घडत  होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या होत्या.  १४ जून रोजी  बाबासाहेब अबु बनकर (वय ४५, रा. कोल्हेवाडी, ता. नगर) यांनी आपली स्वतःची गाडी मार्केट यार्ड परिसरातुन चोरी गेली असल्याबाबतची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. इतर तक्रारी सुद्धा दाखल करण्यात आलेल्या होत्या.


 सदरील गुन्हा दाखल होताच सदर तपास करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोतवाली पोलिसांच्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या चोरी प्रकरणी आरोपी हा माळीवाडा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी कोतवाली पोलिसांच्या पथकाला दिलेल्या सूचनेनुसार आयुर्वेदिक कॉलेजजवळ आरोपीला मोठ्या शिताफीने पोलिसांनी पकडले. आरोपी गणेश याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याच्या साथीदारांचा यामध्ये समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोतवाली पोलिसांनी गेल्या दोन दिवसांमध्ये त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतले व त्यांनी सदर गाड्या चोरल्याची कबुली सुद्धा दिली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन, नगर व इतर पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक  सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे  यांचे मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक मनोज कचरे,  पोना. बंडू भागवत, शाहीद शेख, सुमित गवळी, अभय कदम,  दिपक रोहकले,  आनंद दाणी, योगेश भिंगारदिवे,  नितीन शिंदे, सागर पालवे,  नितीन गाडगे, भारत इंगळे, पोकॉ. सुशील वाघेला सुजय हिवाळे, तान्हाजी पवार,  कैलास शिरसाठ,  प्रमोद लहारे,  सोमनाथ राऊत यांनी केली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only