Thursday, August 5, 2021

आमदार निलेश लंके यांची आरोग्य कर्मचार्यांवर दबंगगिरी; पोलिस निरीक्षकांसमोर लिपिकास मारहाण

 
आमदार निलेश लंके यांची आरोग्य कर्मचार्यांवर दबंगगिरी; पोलिस निरीक्षकांसमोर लिपिकास मारहाण  


पारनेर : प्रतिनिधी


येथील पारनेर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयातील एका लिपिकास मारहाण केल्याची व महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी (दि.4) रात्री उशीरा घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व गट विकास अधिकारी यांच्यासमोरच हा प्रकार घडला असून, यासंदर्भात पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार देत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षकांसमोर मारहाणीची घटना घडूनही अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याने प्रकरण दाबले गेल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुरू झाली आहे.


वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ८:३० वाजता लसीचे टोकण वाटप करण्यासाठी तहसीलदार व डॉ. आडसुळ यांच्या आदेशानुसार लसिच्या लाभार्थ्यांना टोकण वाटप करण्यात आले. रात्री १०:३० वाजता मा.आमदार व डॉ .कावरे यांनी टोकण वाटप करणारे कनिष्ठ लिपीक राहुल दिलीप पाटील,  यांना घरुन बोलवले व त्यांच्यावरती टोकण विकण्याचे आरोप करुन त्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिषा न करता आमदार निलेश लंके यांनी राहुल दिलीप पाटील या कनिष्ठ लिपीकास मारहाण केली. तसेच कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. उंद्रे व डॉ. अडसुळ यांना शिविगाळ करण्यात आली. सदर घटना गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक श्री. बळप यांच्यासमोर घडलेली आहे. तरी सदर घटनेची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वैद्यकीय अधीक्षक यांनी केली आहे.


कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा देत आहेत. लसींची वाढती मागणी आणि कमतरता याचा ताळमेळ जुळवत आरोग्य कर्मचारी अधिकाधिक नागरिकांना लस मिळेल यादृष्टीने नियोजन करून प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत रात्री उशिरा आरोग्य कर्मचाऱ्यांना घरातून बोलून घेणे, त्यांना मारहाण करणे, महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्याचे प्रकार विद्यमान आमदार लंके करत असल्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, पोलीस निरीक्षक   आणि गटविकास अधिकाऱ्यांसमोर ही घटना घडूनही कोणतीही कायदेशीर कारवाई अद्यापही झालेली नसल्याने प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरु झाली आहे. आमदार निलेश लंके यांच्या या दबंगगिरीमुळे वैद्यकीय कर्मचारी वर्तुळात त्यांच्याविरोधात असंतोष पसरला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only