Friday, August 6, 2021

गुन्हे निकाली काढण्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे आदेशजिल्ह्यात कार्यभार स्वीकारला त्यावेळी सुमारे 42 हजार गुन्हे प्रलंबित होते. हे प्रमाण कणी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात साधारतः 2009 पासूनचे काही गुन्हे प्रलंबित आहे. त्यावर लक्ष केंद्रीत केले असून, हे गुन्हे निकाली काढण्याचे आदेश बैठकीत देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


अधीक्षक पाटील यांनी शुक्रवारी (दि.6) तोफखाना पोलिस ठाण्यात सर्व कर्मचार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधीक्षक पाटील यांनी सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांकडे तपासासाठी देण्यात आलेल्या व प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. ज्यांच्याकडे अनेक वर्षांपूर्वीचे गुन्हे तपासासाठी देण्यात आलेले आहेत, ते लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.


अधीक्षक पाटील म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कार्यभार स्वीकारला त्यावेळी 42 हजार गुन्हे जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांकडे प्रलंबित होते. ते 42 हजार नंतरच्या काळातील अशा सुमारे 60 हजार गुन्ह्यांपैकी तब्बल 50 हजार गुन्हे निकाली काढण्यात आले आहेत. मात्र, काही पोलिस ठाण्यांकडे अद्यापही अनेक वर्षांपूर्वीचे जुने गुन्हे प्रलंबित आहेत. अशा पोलिस ठाण्यांचा आढावा घेतला जात आहे. त्याचाच भाग म्हणून तोफखाना पोलिस ठाण्यातही बैठक घेतली. काही कर्मचार्‍यांकडे 50 हून अधिक गुन्हे प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन गुन्ह्याचा तपास या कर्मचार्‍याकडून वेळेत होऊ शकत नाही. गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण 30 टक्क्यांच्या आत आणण्याचा प्रयत्न आहे.


दरम्यान, काही जुने गुन्हे नेमके कुणाकडे तपासासाठी देण्यात आलेले आहेत, याची माहितीच उपलब्ध नाही. अशा प्रकरणांची, गुन्ह्यांबाबतची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only