Sunday, August 22, 2021

भिंगारमधील ‘त्या’ घटनेचे रहस्य आज उलघडणार?

 
भिंगारमधील ‘त्या’ घटनेचे रहस्य आज उलघडणार?


नगर : पोस्को अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी सादिक बिराजदार याच्या मृत्यूनंतर पोलिस प्रशासनाकडून तपासाला वेग आला आहे. पोलिसांच्या फिर्यादीनुसार गाडीतून उडी मारुन पळून जाताना सादिक जखमी झाला की, त्याची पत्नी रुक्सार यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला झालेल्या मारहाणीत सादिक जखमी झाला होता, याबाबत सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर झाला आहे. पोलिस अधीक्षकांकडून आज (दि.23) याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता असून, ते काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सादिक बिराजदार याला ताब्यात घेऊन भिंगार पोलिस ठाण्यात नेत असताना त्याने पोलिस वाहनातून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद पोलिसांनी दिली होती. तर त्यानंतर काही तासांतच त्याची पत्नी रुक्सार हिने सादिकला पोलिस वाहनातून बाहेर काढून पाच जणांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. या दोन्ही घटना भिंगार नाल्याजवळच घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे यापैकी खरी घटना कोणती, याची चौकशी पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्फत सुरू होती. दरम्यानच्या काळात जखमी सादिकवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशी व तपासाच्या कार्यवाहीलाही वेग आला आहे.


‘सीआयडी’कडे सादिकच्या मृत्यू प्रकरणाचा तपास वर्ग झाला आहे. ‘सीआयडी’च्या पथकाने शेकडो कागदपत्रे तपासासाठी ताब्यात घेतली आहे. त्यांच्याकडून स्वतंत्र तपास सुरू झाला आहे. तर दुसरीकडे उपअधीक्षक ढुमे यांच्याकडून प्राथमिक चौकशी अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर झालेला आहे. या प्राथमिक अहवालानुसार पोलिस अधीक्षकांकडून आज माहिती दिली जाण्याची व यातून घटनेचे रहस्य उलघडण्याची शक्यता आहे.


पोलिस बंदोबस्तात दफनविधी

सादिकच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथे करण्यात आले. शवविच्छेदनानंतर रात्री उशिराने त्याचा मृतदेह नगरला आणण्यात आला. रविवारी पहाटे साडेेतीनच्या सुमारास दर्गादायरा येथील कब्रस्तानमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला. यावेळी पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्यासह पाच पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलिस कर्मचारी असा सुमारे दीडशे पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only