Sunday, August 1, 2021

उत्तरेतील 137 तर दक्षिणेतील 57 शाळा सुरू आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग : 16 हजार विद्यार्थी उपस्थित उत्तरेतील 137 तर दक्षिणेतील 57 शाळा सुरू

आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग : 16 हजार विद्यार्थी उपस्थित


। नगर । दि.01 ऑगस्ट । करोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयानंतर नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस शाळा संख्या वाढत आहेत. गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यातील 1 हजार 242 पैकी 194 शाळा सुरू झाल्या असून त्यात 16 हजार 80 विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. सुरू झालेल्या शाळांची संख्या पाहता उत्तर जिल्ह्यातील 137 शाळा तर दक्षिणेतील अवघ्या 57 शाळांचा समावेश यात आहे.


करोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर महिनाभरापूर्वी करोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. यात शाळा सुरू करताना शिक्षकांनी करोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. जिल्ह्यात 15 जुलै रोजी शाळा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी 16 जुलैला 149 शाळा सुरू झाल्या. आता 30 जुलैअखेर जिल्ह्यात 194 शाळा सुरू झाल्या असून त्यात 16 हजार 80 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


करोनामुक्त गावांत शाळा सुरू करताना पालकांची संमतीपत्रे आवश्यक आहेत. पालकांनी परवानगी दिली तरच अशा शाळा सुरू होऊ शकतात. जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण 1 हजार 242 शाळा आहेत. त्यात 85 जिल्हा परिषदेच्या व 1 हजार 157 इतर व्यवस्थापन शाळांचा समावेश आहे. आतापर्यंत 194 शाळा सुरू झाल्या असून इतर गावांतील शाळा कधी सुरू होणार? त्यांना कधी परवानगी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


चौकट

कोणत्या तालुक्यात किती ?

अकोले- 43, संगमनेर- 27, कोपरगाव- 4, राहाता- 33, श्रीरामपूर-16, नेवासा- 14 ( उत्तर- एकूण 137), राहुरी- 10, शेवगाव-12, पाथर्डी- 11, जामखेड- 3, कर्जत-3, श्रीगोंदा-4, पारनेर- 6 आणि नगर- 8 ( दक्षिण- एकूण 57)


चौकट

3 हजार 329 शिक्षकांचे लसीकरण

जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या वर्ग सुरू करतांना शिक्षकांची लसीकरणाचे दोन्ही डोस सक्तीचे करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील 49 शिक्षकांचे तर अन्य व्यवस्थापनातील 3 हजार 280 शिक्षकांचे लसीचे दोन्ही डोस झालेले आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only