Wednesday, August 25, 2021

भिंगार पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि देशमुखांना निलंबित करावे; न्यायालयात दाद मागण्याचा शाकीर शेख यांचा इशारा

 


नगर : भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यातील आरोपी सादिक बिराजदार याच्या अटकेच्या कार्यवाहीत नियमांचे पालन न केल्याप्रकरणी व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी तिघांना निलंबित करत ठाण्याचे प्रभारी सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्यावर मात्र कारवाई केलेली नाही. मुळातच सर्व घटना ही देशमुख यांच्याच नियंत्रणाखाली घडलेली असून, या प्रकरणी त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे.


भिंगार पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मैनुद्दीन शेख व अंबादास पालवे यांनी स्वातंत्र्यदिनी रात्री 8 वाजता मुकुंदनगर येथून सादिक बिराजदार यास ताब्यात घेतले. भिंगार नाल्याजवळ सादिक बिराजदार याने वाहनातून बाहेर उडी मारली व त्यामुळे सादिक यास डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला. मैनुद्दीन शेख यांनी पोलिस उपनिरीक्षक बी. ए. देशमुख यांना माहिती दिली व त्यानंतर पुढील उपचाराकरिता सादिक याला जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. त्यानंतर त्याला मॅककेअर हॉस्पीटल येथे रात्री दाखल केले. याबाबतची फिर्याद भिंगार पोलिसात दाखल आहे.

त्यानंतर बिराजदार याची पत्नी रुक्सार यांनी पाच व्यक्तींनी त्यांचे पती सादिक यास मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झालेला आहे, अशी फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन मी सांगितल्याप्रमाणे फिर्याद नोंदविण्यात आलेली नाही व सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख यांना निलंबित करणे आवश्यक आहे, ते कर्मचारी व आरोपींना पाठिशी घालत आहे, असे आक्षेप नोंदविले. अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांच्याकडे प्राथमिक चौकशी सोपविली. त्यांनी चौकशी अहवाल सादर केला असून, त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी पोलिस उपनिरीक्षक बी. ए. देशमुख, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मैनुददीन शेख, पोना अंबादास पालवे यांना निलंबित केले आहे. मात्र, चौकशीमध्ये सपोनि देशमुख यांना का वगळण्यात आले? संपूर्ण प्रकरणाची माहिती देशमुख यांना असताना व त्यांच्या नियत्रंणाखाली संपूर्ण घटना घडलेली असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. सादिक जखमी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक वैद्यकीय तपासणी व सीटी स्कॅन करण्यासाठी साधारण एक तासाचा कालावधी लागत असताना 10 मिनिटांत ही सर्व प्रक्रिया करुन मॅककेअर हॉस्पिटलमध्ये कसे दाखल केले जाते? अधिकृत वाहन चालक नसताना शेख व पालवे यांनी सदर वाहन कोणाच्या आदेशाने नेले? या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पोलिस कोठडीत आरोपीच्या मृत्यूबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केलेली आहेत. अशा घटनेत अटक आरोपीची सुरक्षा, आरोग्य व जिवीतेची जबाबदारी त्यास अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाऊस ऑफिसर व त्या पोलिस ठाण्याचा वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांची असते. असे असतानाही सपोनि देशमुख यांना वगळण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. पोलिस अधीक्षकांनी तिघांना निलंबित करताना देशमुख यांना वाचविले आहे. त्यांना पाठिशी घालण्यात आले आहे. देशमुख हे पदावर कार्यरत राहिल्यास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत खरी माहिती देण्यासाठी साक्षीदार व मृताचे कुटुंबिय पुढे येणार नाही किंवा त्यांच्याकडून साक्षीदारांना खरी माहिती सांगून नये, अशी धमकी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सादिक याचे कुटुंब भितीच्या सावटाखाली असून त्यांना न्याय मिळेल का नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे.


सन 2018 मध्ये नगरसेवक कैलास गिरवले यांचाही पोलिस कोठडीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पवार व त्यांच्या सहकारी व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मारहाणीत मृत्यु झाला होता. त्यावेळीही पवार यांच्यावर कारवाईन झाल्यामुळे सत्य माहिती सांगण्यासाठी खरे साक्षीदार पुढे आले नाहीत. आजही त्यांचे कुटुंबीय न्यायापासून वंचित आहे. या प्रकरणातही अशीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सपोनि देशमुख यांना निलंबित करावे, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही शेख यांनी दिला आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only