Thursday, August 5, 2021

नोकराने केली व्यवसयिकाची 33 लाखाची फ़सवणूक


एका व्यावसायिकाच्या नोकराने त्याला बँकेत भरण्यासाठी दिलेली 30 लाखांची रोकड व पुण्यात देण्यासाठी दिलेले 75 ग्रॅम सोने घेऊन दिलेले काम न करता फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि.5) सकाळी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुलमोहर रोडवरील व्यावसायिक संतोष सोपान बुराडे (वय 59) यांनी याबाबत फिर्याद दिली असून, नवनाथ अनिल केरुळकर (रा.शेंडी पोखर्डी, ता.नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुराडे यांनी त्यांना बाहेरगावी जायचे असल्याने त्यांचा नोकर केरुळकर याला सकाळी सहा वाजता घरी बोलावून घेतले. त्याच्याकडे 30 लाख रुपयांची रोकड देऊन प्रवरा बँक उघडल्यानंतर आरटीजीएसद्वारे पायल गोल्ड यांच्या पुण्यातील बँक खात्यात जमा करण्यासाठी सांगितले होते. त्यासाठी त्यांनी क्रॉस चेकही त्याला दिला. तसेच पुणे येथील सोन्यामारुती चौक येथील दागिने तयार करणारे कारागिर निलेश सोनी यांच्याकडे देण्यासाठी 75 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडाही त्यांनी नोकराकडे दिला होता. तो निघून गेल्यानंतर बुराडे यांनी बराच वेळ त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाईल बंद होता. त्याच्या घरीही बुराडे यांनी संपर्क साधला. मात्र, तो घरी नव्हता. पुण्यातील व्यापार्‍याकडेही त्यांनी माहिती घेतली. तेथेही तो पोहचला नाही. त्यामुळे केरुळकर याने दिलेले काम न करता मोबाईल बंद करुन बुराडे यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


बुराडे यांच्या फिर्यादीनुसार 30 लाखांची रोख रक्कम, 3.67 लाख रुपयांचा सोन्याचा तुकडा व 500 रुपये रोख अशी 33 लाख 67 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलिस करत आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only