Thursday, August 19, 2021

उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक सहा तास थांबणार


उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक सहा तास थांबणार


अहमदनगर -


नगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी रात्री सहा तास सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे. दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर रोजी मध्य रात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यत सक्कर चौक ते कोठी चौकादरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली. 


उड्डाणपुलाच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला होता. नगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डापुलाचे काम प्रगतीपथावर असून त्या अनुषंगाने सक्कर चौक ते चांदणी चौकादरम्यान लाँचिंग गर्डरचे काम करायचे आहे. 


हे काम चालू असताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद करून मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम 2 सप्टेंबर 2022 पर्यत सुरू राहणार असल्याचे दिनेशचंद्र अग्रवाल इन्फ्राकॉन कंपनीने कळविले आहे. 


दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पहाटे सहा वाजेपर्यत सक्कर चौक ते कोठी चौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. तसेच अहमदनगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक शेंडी बायपास-शासकीय दूध डेअरी चौक-विळद बायपास-निंबळक बायपास-कांदा मार्केट रोड-केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून मनमाड, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक केडगाव बायपास- निंबळक-विळद-शासकिय दूध डेअरी चौक-शेंडी बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे. बीड, जामखेड, पाथर्डीकडे जाणारे-येणारी अवजड वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. 


पुण्याकडून येणार्‍या वाहनांकरिता केडगाव बायपास-अरणगाव-वाळुंज-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. मनमाड, औरंगाबादकडून येणार्‍या वाहनांकरिता विळद बायपास-शासकिय दूध डेअरी-शेंडी-एसपीओ  चौक-चांदणी चौक-मुठ्ठी चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद या मार्गावरील हलक्या वाहनांसाठी मार्ग बदलला आहे. यामध्ये सक्कर चौक-आनंदऋषीजी हॉस्पीटल-महात्मा फुले चौक-कोठी आणि सक्कर चौक येथून टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-नेप्ती नाका-दिल्लीगेट-अप्पू हत्ती चौक-पत्रकार चौक-एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे. 


त्याचप्रमाणे अवजड वाहतूक शहरातून जाऊ नये म्हणून हॉटेल यश पॅलेस, कोठी चौक, नेप्तीनाका येथे दिल्ली गेटकडे येणारे रोडवर व पत्रकार चौक येथे अप्पू हत्ती चौकाकडे जाणारे रोडवर फक्त दुचाकी व हलकी वाहने जातील इतक्या उंचीचे हाईट बॅरीअर बसविण्यात येणार आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only