Friday, September 24, 2021

मार्केटयार्डमध्ये महावितरणच्या भरारी पथकाने पकडली 20 लाखाची वीजचोरी

 
मार्केटयार्डमध्ये महावितरणच्या भरारी पथकाने पकडली 20 लाखाची वीजचोरी

 

। नगर । दि.25 सप्टेंबर । महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने नगरच्या मार्केटयार्ड मधील भाजीपाला मार्केटमध्ये असलेल्या गाळ्यात छापा टाकून तब्बल 20 लाखाची वीज चोरी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.24) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 महावितरण मधील अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदी कार्यरत असलेले प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कनिष्ठ अभियंता आशिष नावकार, जे. पी. फटांगडे, एस. बी. बिटनर, ए. सी. बोडखे, यशवंत वेदपाठक यांच्या पथकाने 14 सप्टेबर रोजी दुपारी मार्केटयार्ड मधील भाजीपाला विभागातील मच्छिंद्र रामभाऊ ताठे यांच्या गाळ्यातील मीटरची तपासणी केली होती. सदरच्या गाळ्याचा वापर संतोष राजू ढवळे हे करत असल्याचे यावेळी या पथकाला सांगण्यात आले होते. गाळ्यातील मीटर हे नॉट डिस्प्ले होते. त्यामुळे सदरचे मीटर तपासणीसाठी काढून मीटर चाचणी कक्षात पाठविण्यात आले होते.


 सदर मीटरची 17 सप्टेबर रोजी दुपारी ढवळे यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत तपासणी केली असता मीटरच्या खालील बाजूस टर्मीनल जवळ 1 छिद्र पाडलेले दिसले व मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी केली जात असल्याचे दिसून आले. सदरची वीज चोरी ही ऑगस्ट 2017 पासून करण्यात आलेली असून त्याची युनिट संख्या 94 हजार 734 एवढी होते. या वीज चोरीची एकूण किंमत 19 लाख 65 हजार 920 होत असून तडजोडीची रक्कम 45 हजार इतकी आहे. सदरची रक्कम भरण्यासाठी ढवळे यांना आठवडाभराचा कालावधी दिला होता. मात्र त्यांनी या कालावधीत वीज चोरीसह तडजोडीची रक्कम न भरल्यामुळे भरारी पथकाचे प्रमुख प्रदीप सावंत यांनी शुक्रवारी (दि.24) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गाळा मालक मच्छिंद्र रामभाऊ ताठे व वापरकर्ता संतोष राजू ढवळे यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम 2003 चे कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only