Wednesday, September 1, 2021

मेसेज पाठवून दिला तलाक, 10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 मेसेज पाठवून दिला तलाक, 10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


नगर : एका विवाहितेचा माहेरुन 10 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ करुन पतीने मोबाईलवरुन तलाक..तलाक..तलाक.. असा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक देत घरातून बाहेर काढल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 एप्रिल ते 26 ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली.


संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खालेद ख्वाजा सय्यद (पती), ख्वाजा मैमुद्दीन सय्यद (सासरे), परवेज ख्वाजा सय्यद (दीर), परवीन ख्वाजा सय्यद (सासू), सुग्रावी ख्वाजा सय्यद (सासूची आई) (सर्व रा.मर्कज मस्जिद, रायमोह, ता.शिरुर कासार, जि.बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर 2017 मध्ये मुस्लिम धर्मशास्त्रानुसार विवाह पार पडला. संबंधित विवाहितेच्या पतीला स्टेट बँकेत परमनंट नोकरीसाठी सासरच्या लोकांनी लग्नाच्या वेळीच 15 लाखांची मागणी केली. विवाहितेच्या वडिलांनी लग्नावेळी 3 लाख व नंतर 2 लाख असे पाच लाख रुपये विवाहितेच्या पतीला दिले. त्यानंतरही आणखी दहा लाखांची माणगी करत सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला. भरोसा सेलमध्ये तक्रार झाल्यानंतर सामोपचाराने वाद मिटविण्यातही आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा विवाहितेचा छळ सुरूच राहिला. 26 ऑगस्ट रोजी विवाहितेच्या पतीने तिला मोबाईलवर ‘तलाक’चा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. त्यानंतर घरातून बाहेर काढले. त्यामुळे विवाहितेने बुधवारी (दि.1) भिंगार कॅम्प पोलिसात फिर्याद दिली आहे.


कॅम्प पोलिसांनी पती, सासू, सासरा, दीर व सासूच्या आईसह पाच जणांविरोधात गुरनं 363/2021, कलम 498(अ), 323, 504, 506, 34, मुमवि (अधि.संरक्षण) अधिनियम 2019 चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only