Saturday, September 11, 2021

अवैध सावकारांवर कारवाई करणार: जनतेने तक्रारी देण्याचे केले आवाहन

 
अवैध सावकारांवर कारवाई करणार:  जनतेने तक्रारी देण्याचे केले आवाहन


नगर दिनांक 11 प्रतिनिधी


 पोलीस ठाण्यात आलेल्यांची तक्रार घेतली पाहिजे. पण दुसरीकडे त्या गुन्ह्यांचा सुद्धा निपटारा  तात्काळ कशा पद्धतीने होईल या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत. गुन्हेगारांची माहिती एकत्रितपणे कशा पद्धतीने उपलब्ध होईल याकरता नगर जिल्ह्याने जी टू प्लस योजना कार्यान्वित केली आहे त्याचधर्तीवर काही बदल करून ती योजना नाशिक विभागात राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी .जी शेखर पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

शेतकरी वर्गाची फसवणूक होत असल्यामुळे त्या गुन्ह्यांकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. अवैध सावकार यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला आम्ही तयार आहोत, जनतेने सुद्धा पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले.


आज नगर जिल्ह्याचा आढावा बीजी शेखर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी उपस्थित होते.


महानिरीक्षक शेखर म्हणाले की, पोलिस ठाण्यामध्ये येणाऱ्यांची तक्रार घेतली पाहिजे. पण दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यावर आपण तात्काळ कारवाई केली पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सर्व पोलीस ठाण्यांना तशा सूचनाही दिल्या असून, त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. शेतकरीवर्गाची सुद्धा फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. याची सुद्धा अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये अशा गुन्ह्यांचा तात्काळ निपटारा करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. आज अवैध सावकारीचा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. जनतेने पुढे यावे आपली तक्रार द्यावी. निश्चितपणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.


आज गुन्हेगारी वाढत चालली असतानाच दुसरीकडे त्यांना जरब बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने नेहमीच कडक पावले उचललेली आहेत. त्याच अनुषंगाने गुन्हे रोखण्यासाठी त्या गुन्हेगारांवर कशा पद्धतीने नजर ठेवता येईल याकरता आम्ही आता प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एका पोलिसाला दोन आरोपींची सातत्याने पडताळणी करण्यासंदर्भात ॲप विकसित केलेले आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही नाशिक परिक्षेत्र विभागामध्ये करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जेणेकरून तो आरोपी त्या ठिकाणी राहतो की नाही हे लक्षात येईल. त्याच्यावर सातत्याने पोलिसांना नजर ठेवता येईल व तो परत कुठला गुन्हा करणार नाही याचीसुद्धा माहिती पोलिसांकडे राहील असेही ते म्हणाले. सुरुवातीला एखाद्या तरुणाकडून कळत-नकळत गुन्हा दाखल झाला असेल किंवा त्यानी तो गुन्हा केला असेल अशांना गुन्हेगारी पासून प्रवृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी िश्‍चितपणे प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. 

सायबर क्राईम सर्वत्र वाढत चालले आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण दुसरीकडे नागरिकांनी सुद्धा तेवढेच जागृत राहणे महत्त्वाचे आहे. आपली फसवणूक होणार नाही याची सुद्धा त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. याकरता आता स्थानिक पोलिस प्रशासनाने सुद्धा जनजागृती करता विशेष मोहीम हाती घ्यावी, असेही ते म्हणाले. तसेच आगामी काळामध्ये आम्ही या क्राईमच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरता मेळावे सुद्धा आयोजित करणार असल्याचेही ते म्हणाले.


आजही घरगुती समस्यांचे गुन्हे हे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये काही गुन्हे थांवले होते. पण आता घरगुती गुन्हे वाढले आहेत. पती-पत्नीचे भांडणे थांबण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये संवाद चांगल्या पद्धतीने कसा राहील याकरता सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे. पोलीस विभाग सुद्धा या संदर्भामध्ये निश्चितपणे पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले.


नगर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या हा मोठा जिल्हा आहे. आठ जिल्ह्यांच्या सीमा या जिल्ह्याला आहेत. जे काही पोलीस ठाण्याचे निर्मितीचे प्रस्ताव प्रलंबित आहे तेसुद्धा तात्काळ कशा पद्धतीने मंजुरीला जातील, याकरता निश्‍चितपणे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गेल्या पाच वर्षापासून नगर जिल्ह्यातील पोलिसांच्या घरांच्या संदर्भातला विषय प्रलंबित आहे. लवकरच शासन निधी उपलब्ध होईल. त्यानंतर या घरांची पूर्तता निश्चितपणे होईल, त्यासाठी आम्हीसुद्धा सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only