Thursday, September 2, 2021

रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 4 लाख 60 हजार 500 रूपयांचा ऐवज लांबविला

 




पुण्याला जाण्याचा बहाणा करून गाडीतील चोरट्यांनी व्यापार्‍याचे साडेचार लाखाचे दागिने लांबविले

नगर, ता.2- हम पुना जा रहे है, आपको जल्दी पुना छोड देंगे, असे म्हणून पुण्याच्या व्यापार्‍यास चारचाकी गाडीतील चोरट्यांनी लुटले. या चोरट्यांनी व्यापार्‍याची रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 4 लाख 60 हजार 500 रूपयांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवारी (दि.1) भरदुपारी माळीवाडा बसस्थानक ते केडगाव बायपास दरम्यान घडली. रसिकलाल मोतीलाल सोळंकी (वय 67, रा. पेरणे फाटा, ता. हवेली, पुणे) असे या व्यापार्‍याचे नाव आहे.

सोळंकी यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोळंकी हे दि. 1 रोजी दुपारी तीन वाजता पुण्याला जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानक येथून पुणे बसस्थानकाकडे जात असताना माळीवाडा बसस्थानकाबाहेर एक पांढर्‍या रंगाची चारचाकी गाडी त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. हम पुना जार रहे है आपको जल्दी पुना छोड देंगे, असे गाडी चालक म्हणाला. त्यास सोळंकी यांनी होकार दिला. गाडी चालकाने त्यांच्या बॅगा गाडीच्या पाठीमागील बाजूस ठेवल्या. त्यानंतर सोळंकी हे चालकाच्या बाजुच्या सीटवर बसले. त्यांची पत्नी गाडीच्या मधल्या सीटवर बसली. त्याठिकाणी आधीपासूनच एक महिला, एक पुरूष व त्यांच्यासोबत दोन मुले बसलेले होते. पाठीमागील बाजूस दोन पुरूष बसलेले होते. त्यानंतर गाडी पुण्याला जाण्यासाठी निघाली. केडगाव बायपास येथील एका हॉटेलजवळ गाडी आली असता, चालकाने गाडी थांबविली. मला माझ्या मालकाचा फोन आला आहे. मी परत माल घेण्यासाठी नगरला जात आहे. तुम्ही येथे उतरा, मी परत येतो तुम्ही येथेच थांबा असे म्हणून व्यापारी दाम्पत्यास त्यांच्या बॅगांसह खाली उतरून गाडीसह तो नगरच्या दिशेने निघून गेला. व्यापारी दाम्पत्याने बराच वेळ वाट पाहिली. परंतु तो न आल्याने व्यापारी दाम्पत्य केडगाव बायपास येथून बसमध्ये बसून त्यांच्या घरी पेरणे फाटा येथे निघून गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी बॅगा चेक केल्या असता, बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सदर व्यापार्‍याने कोतवाली पोलिस ठाणे गाठत सदर प्रकरणाची फिर्याद दिली. कोतवाली पोलिसांनी अज्ञातांविरोधात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only